उपचारांसाठी दाखल केलेल्या तरुणाचा सोमवारी मध्यरात्री मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुबी हॉल रुग्णालयाच्या काचा आणि कुंडय़ांची तोडफोड केली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयाकडून मात्र नातलगांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
रुग्णालयाचे सुरक्षारक्षक अधिकारी हिरामण भिकू सोनवणे (वय ४२ , रा. येरवडा) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यावरून रुग्णाच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

अमन गलांडे

अमन डी. गलांडे (वय १८, वडगाव शेरी) नावाच्या तरुणाला २२ ऑगस्ट रोजी रुबी रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा सोमवारी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. किडनीच्या विकारामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सकाळी साडेआठच्या सुमारास अमनचा मृतदेह घेण्यासाठी त्याचे नातेवाईक आले. त्यांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तीस ते चाळीस जणांनी रुग्णालयाच्या पुढील बाजूच्या कुंडय़ा आणि काचा फोडून नुकसान केले. यामध्ये सध्या तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तोडफोडीत सव्वा चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. पी. जाधव या करत आहेत.
अमनचा मावस भाऊ अनिरुद्ध घुले यांनी सांगितले की, पोटात दुखत असल्यामुळे अमनला रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनी डॉक्टरांनी काही चाचणी करण्यासाठी सांगितले. त्यानंतर २६ तारखेला पुन्हा तीच चाचणी करण्याची सूचना डॉक्टरांनी केली. सोमवारी रात्री अमनची तब्येत ढासळली. त्याला डायलेसिसवर ठेवावे लागेल. त्यासाठी दीड लाख रुपये भरण्यास सांगितले होते. डॉक्टरांनी दोन दिवस उशिरांनी चाचणी केल्यामुळेच अमनचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, रुग्णालयात भरती करते वेळीच रुग्णाची अवस्था गंभीर असल्याचे तसेच त्याबद्दल रुग्णाच्या नातेवाइकांना लेखी कल्पना देण्यात आली होती, असे रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक डॉ. सुजाता मलिक यांनी सांगितले. रुग्णावर ‘सेप्टिसिमिया’ या आजारासाठी उपचार सुरू होते. या आजाराच्या व स्वाइन फ्लूच्या लक्षणांमध्ये साम्य असल्यामुळे रुग्णाची एच १ एन १ साठी तपासणी करून घेण्यात आली होती. ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’च्या तपासणीत रुग्णाला स्वाइन फ्लू नसल्याचे दिसून आले होते. रुग्णालयाने ७६ हजारांचे बिल माफ करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.