25 September 2020

News Flash

नृत्य ही एक स्वतंत्र भाषाच!

चिदंबरम मंदिराच्या स्तंभावर असलेल्या नृत्यमुद्रांविषयी जानकी रंगराजन या कार्यशाळेत मार्गदर्शन करीत आहेत.

नृत्य ही एक स्वतंत्र भाषाच आहे. ही भाषा वाचता आली पाहिजे. भरतनाटय़म, कथक, ओडिसी नृत्यशैली कोणतेही असो. नृत्य न्याहाळण्याची सवय आणि सराव याच्याआधारे ही भाषा आत्मसात करता येते.. प्रसिद्ध भरतनाटय़म नृत्यांगना डॉ. जानकी रंगराजन यांनी आपल्या अनुभवाचे बोल गुरुवारी उलगडले.
‘नृत्ययात्री’ संस्थेतर्फे भरतनाटय़म कार्यशाळेसाठी जानकी रंगराजन पुण्यामध्ये आल्या असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चिदंबरम मंदिराच्या स्तंभावर असलेल्या नृत्यमुद्रांविषयी त्या या कार्यशाळेत मार्गदर्शन करीत आहेत. संस्थेच्या अध्यक्षा मेघना साबडे आणि श्रद्धा पळसुले या वेळी उपस्थित होत्या. टिळक स्मारक मंदिर येथे रविवारी (४ ऑक्टोबर) सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या ‘संविक्षणा’ कार्यक्रमात त्यांच्या भरतनाटय़म नृत्याविष्कार अनुभवण्याची संधी लाभणार आहे. नायिकेचे तिच्या परमेश्वरावर असलेले उत्कट प्रेम त्या या आविष्कारातून सादर करणार आहेत.
सध्याची पिढी शास्त्रीय नृत्य शिकण्याबाबत उत्सुक असून त्यांना या वेगवेगळ्या नृत्यशैलींविषयी कुतूहल आहे. भारतीय वंशाच्या मुला-मुलींबरोबरच जपान, चीन यासारख्या देशातील युवा पिढीमध्ये नृत्य ही कला आत्मसात करण्याची उत्सुकता दिसते. अनेकजण नृत्यामध्ये कारकीर्द घडविण्याचे धाडस दाखवताना कचरत नाहीत. शास्त्रीय नृत्य शिक्षणातून राग, ताल आणि लक्षण यांचे ज्ञान होते. त्यामुळे एखादा कलाकार हा उत्तम नृत्यकार आणि नृत्यसंरचनाकार होऊ शकेल, असेही जानकी रंगराजन यांनी सांगितले.
नृत्यकला शिक्षणामध्ये शिस्त महत्त्वाची. ही शिस्त नसेल तर ही कला साध्य करणे अवघड होते. सर्व नर्तकांनी योगासने करणे आवश्यक आहे. योगासनांमुळे विचारांमध्ये स्पष्टता येते आणि सादरीकरणामध्ये लवचिकता आपोआप येते हा अनुभव सांगताना आळशी असाल तर नृत्य क्षेत्राकडे वळू नका, असा सल्लाही जानकी रंगराजन यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2015 3:13 am

Web Title: dance is separate language dr rangrajan
Next Stories
1 स्वातंत्र्य विकण्यापेक्षा बाबासाहेबांची अस्मिता जागृत ठेवा – राजा ढाले
2 शहर बकाल करणाऱ्यांचा मुलाहिजा ठेवू नका – अजित पवार
3 आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना राजा ढाले यांच्या कानपिचक्या
Just Now!
X