18 February 2019

News Flash

स्पर्शातून नृत्याविष्काराचे शिल्प साकारण्याचे खडतर कार्य

सर्वसाधारण मुलांना लय आणि ताल समजतो. पण, कर्णबधिर मुलांना हे काहीच समजत नाही.

नृत्यांगना शिल्पा दातार

कर्णबधिर मुलींना नृत्य शिकविण्याची दोन दशके

पुणे : लय आणि ताल समजणाऱ्यांना नृत्यकला आत्मसात करणे सहजसोपे असते. पण, ज्यांना जन्मापासून ऐकूच येत नाही, अशा गरीब घरातील कर्णबधिर मुलींना केवळ स्पर्शातून नृत्याविष्काराचे शिल्प साकारणे हे खडतर काम प्रसिद्ध कथक नृत्यांगना शिल्पा दातार गेल्या दोन दशकांपासून करीत आहेत. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर या मुलींचे नृत्यशिक्षण थांबते, ही खंत असली तरी दरवर्षी नव्या विद्यार्थिनींना नृत्य शिकविण्याची संधी लाभते याचा आनंद आहे.

रेडक्रॉस संस्थेतील कर्णबधिर मुलींना नृत्य शिकविण्याबरोबरच या क्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या गरजू मुलींना कथकचे प्रगत शिक्षण देण्यासाठी ‘शिल्पा नृत्यालय’ ही संस्था त्यांनी स्थापन केली आहे. या मुलींना शिष्यवृत्ती देण्याचा माझा मानस आहे. मात्र, नृत्य शिकविण्यापेक्षा मुलीचे लग्न लावून देण्यामध्येच पालक धन्यता मानत असल्यामुळे या मुलींच्या नृत्यशिक्षणाला दहावीनंतरच पूर्णविराम मिळतो, असे शिल्पा दातार यांनी सांगितले.

मी मूळची शिल्पा शेठ. लहानपणापासूनच मला नृत्याची आवड होती. हे ध्यानात घेऊन बारावीनंतर नृत्यामध्येच कारकीर्द करायची असे ठरविले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून नृत्य विषयातच बी. ए. आणि एम. ए. पदवी संपादन केली. ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनीषा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली माझे नृत्य शिक्षण झाले. गांधर्व महाविद्यालयाची नृत्य विशारद आणि नृत्य अलंकार पूर्ण केले. कर्णबधिर मुला-मुलींना शिक्षण देणाऱ्या रेड क्रॉस संस्थेशी माझा गेल्या २२ वर्षांपासूनचा संबंध. माझी आई सरोज शेठ या संस्थेशी संबंधित होती. त्यामुळे या संस्थेला भेट देण्यासाठी मी गेले होते. सर्वसाधारण मुलांना लय आणि ताल समजतो. पण, कर्णबधिर मुलांना हे काहीच समजत नाही. त्यामुळे ‘तुझे नाव काय किंवा तुला नृत्य करायला आवडते का,’ असे विचारले असता त्यांना समजतंय,पण बोलता येत नसल्याने काही सांगता येत नाही, हे समजले. ‘आमच्या मुलींना तू नृत्य शिकवशील का’ या तेथील प्राचार्यानी विचारलेल्या प्रश्नाने मला अंतर्मुख केले आणि हे आव्हान स्वीकारायचे असे मी ठरविले.

ऐकायला येत नसल्यामुळे कर्णबधिर मुली नृत्य कसे करणार हा प्रश्न होताच. पण, या मुलींना स्पर्शाची भाषा समजते याची जाणीव झाली. केवळ स्पर्श केल्यामुळे आपल्या अंगामध्ये असलेली लय त्या कर्णबधिर मुलींना पटकन समजते ही बाब ध्यानात आली. स्पर्श हेच माझ्यासाठी संवादाचे आणि या मुलींसाठी नृत्य शिक्षणाचे माध्यम बनले. राधा-कृष्ण संवाद, तबलावादनाचा ताल आणि बासरीची धून याचा त्या मुलींना श्रवणयंत्रातून अंदाज येतो. पण, या मुली इतक्या गरीब घरातील असतात की त्यांना श्रवणयंत्र घेण्यासाठी पालकही फारसे उत्सुक नसतात. नृत्य शिकण्याची मुलींची इच्छा असते. नृत्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आनंददायी नृत्याद्वारे व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो याची पालकांना कल्पनाच नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मुलींचे प्रावीण्य

कर्णबधिर मुलींना नृत्य शिकविताना सुरुवातीला अवघड गेले. पण, नंतर मी ‘मुक्यांची भाषा’ (साइन लँग्वेज) आत्मसात केली. त्या भाषेसह स्पर्शातून नृत्यशिक्षणाची पद्धती विकसित केली. आमच्या मुलींनी देशभरात विविध ठिकाणी नृत्याविष्कार सादर करून पारितोषिके पटकाविली आहेत, असे त्या सांगतात.

First Published on October 12, 2018 2:01 am

Web Title: dancer shilpa datar teaching dance to deaf girls from two decades