महापालिकेच्या उत्पन्नात येत असलेली घट विचारात घेऊन थकीत मिळकत कर वसुलीच्या दृष्टीने गांभीर्याने प्रयत्न सुरू झाले असून कर वसुलीची धडक मोहीम शुक्रवार (१५ नोव्हेंबर) पासून हाती घेतली जाणार आहे. सर्व प्रभागांमध्ये एकाच वेळी ही मोहीम सुरू होत असून ती ३१ डिसेंबपर्यंत सुरू राहील.
स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी बुधवारी ही माहिती दिली. थकीत मिळकत कर वसुलीसाठी हाती घेण्यात येत असलेल्या या मोहिमेत सर्व ७६ प्रभागांमध्ये निवासी व व्यापारी मिळकती तसेच मोकळ्या जागा आणि मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाणार असून आवश्यकतेनुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर सुरक्षा रक्षकही दिले जाणार आहेत.
थकीत मिळकत कराच्या वसुलीबरोबरच शहरातील हजारो मिळकती अशा आहेत, की ज्यांना कर लागू झालेला नाही. अशा कर लागू न झालेल्या मिळकतींचा शोधही या मोहिमेत घेतला जाईल. तसेच अनेक मिळकतींचा वापर बदललेला आहे. निवासी मिळकतींचा वापर व्यापारी कारणांसाठी होत आहे. अनेक मोकळ्या जागांना कर लागू झालेला नाही, तसेच पूर्वी ज्या जागांची नोंद मोकळ्या जागा म्हणून झाली होती त्या जागांचा आता काही ना काही कारणांसाठी वापर होत आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी भोगवटापत्र घेतल्यानंतर आणखी काही मजल्यांचे बांधकाम केले आहे. या आणि अशा अनेक मिळकतींकडून कर वसूल होत नसल्याचे दिसून आले आहे. अशा मिळकतींचा शोध घेऊन संबंधितांकडून कराची वसुली करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात येत असल्याचे तांबे यांनी सांगितले. दीड महिना चालणाऱ्या या मोहिमेत चांगल्या प्रकारे थकीत कराची वसुली होईल तसेच कर लागू न झालेल्या मिळकतींचाही शोध लागेल, अशी अपेक्षा आहे.