राजीव गांधी स्मारक समितीची विभागीय आयुक्तांकडे मागणी

पुणे : मुंबईच्या धर्तीवर विभागीय आयुक्तांनी डॅशबोर्डचे काम त्यांच्या अखत्यारित घ्यावे आणि डॅशबोर्डवरील खाटांची माहिती सातत्याने अद्ययावत करावी, अशी मागणी राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी विभागीय आयुक्तांकडे के ली आहे.

समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी, माजी महापौर प्रशांत जगताप, डॉ. जयश्री तोडकर, मुकुंद किर्दत, आयएमए पुणेचे अध्यक्ष डॉ. बी. एल. देशमुख, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रशांत बधे, डॉ. अभिजित मोरे, रवींद्र माळवदकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख शाम देशपांडे, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सूर्यकांत मारणे यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले.

करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शहरात उपाययोजना सुरू आहेत. लसीकरण नोंदणी, प्रवेश प्रक्रिया, प्रवास परवानगी ऑनलाइन पद्धतीने दिली जात आहे. शहरात तंत्रज्ञान उपलब्ध असताना आणि माहिती तंत्रज्ञानाचे शहर अशी ओळख असतानाही शहरात खाटांची माहिती देणारा डॅशबोर्ड योग्य पद्धतीने कार्यान्वित नाही. महापालिके च्या अखत्यारित ११ हजार ५०० खाटांच्या उपलब्धतेची माहिती रुग्णांना योग्य प्रकारे मिळत नाही. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी डॅशबोर्ड त्यांच्या नियंत्रणाखाली घ्यावा आणि खाटांची माहिती सातत्याने अद्ययावत करून नागरिकांना द्यावी. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असे या निवेदनात गोपाळ तिवारी यांनी म्हटले आहे.