पुणे : डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून मित्रमैत्रिणी जोडण्याच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार शहरात सुरू झाले आहेत. वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकासह दोघांची ३ लाख ८४ हजारांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

याबाबत एका ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरोधात फसवणूक तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर अज्ञाताने संपर्क साधला होता. डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून ओळखी वाढतील, असे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते. त्यानंतर अज्ञाताने एका बँक खात्यात तक्रारदाराला पैसे भरण्यास लावले. गेल्या तीन महिन्यांत त्यांच्याकडून ३ लाख ७४ हजार रुपये उकळण्यात आले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला.

त्यानंतर संबंधित गुन्हा तपासासाठी समर्थ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम तपास करत आहेत.

युवकाला लुटले

डेटिंग अ‍ॅपच्या प्रलोभनातून एका युवकाला कोंढवा भागात बोलावून त्याच्याकडील दहा हजारांची रोकड लुटण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. तक्रारदाराने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी कृष्णा महादेव घाडगे, दीपक ईश्वर नरवटे यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.