पुणे : शहर स्वच्छतेला हातभार लावणाऱ्या कचरावेचक वंदना लोंडे यांची मुलगी ज्योत्स्ना हिची जपानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत ज्योत्स्ना लोंडे हिने सुवर्णपदकाची कमाई केली.

कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत आणि स्वच्छ या सफाई कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या वंदना लोंडे या सदस्य आहेत. गेली बारा वर्षे त्या शहर स्वच्छतेचे काम करत आहेत. वंदना यांची अठरा वर्षीय मुलगी ज्योत्स्ना दहाव्या वर्षांपासून कराटेचे प्रशिक्षण घेत आहे. दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक विजेती ठरल्यावर तिची निवड ऑगस्टमध्ये जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली. मात्र आर्थिक कारणांमुळे जपानचा पल्ला गाठण्यासाठी सहकार्याची गरज असल्याचे वंदना लोंडे यांनी सांगितले. लोंडे म्हणाल्या, मुलीचे पालक तिच्या विवाहासाठी आर्थिक तजवीज करतात, मात्र एकल पालक म्हणून ज्योत्स्नाला मोठे करताना तिला हवे ते शिक्षण घेता यावे असा प्रयत्न मी केला. कराटेची आवड निर्माण होताच चिकाटीने प्रयत्न करून ज्योत्स्नाने ब्लॅक बेल्ट पर्यंत मजल मारली. ज्योत्स्ना सांगते, कराटे शिकण्यास सुरुवात केल्यानंतर मी कधीही क्लास चुकवला नाही. प्रशिक्षण हे दमवणारे आहे मात्र कराटे शिकण्यात मिळणारा आनंद महत्त्वाचा आहे.  ज्योत्स्नाला मदत करण्यासाठी

केकेपीकेपी१९९३अ‍ॅटजीमेल डॉट कॉम (kkpkp1993@gmail.com) वर संपर्क करण्याचे आवाहन कागद काच पत्रा कष्टकरी संघटनेकडून करण्यात आले आहे.