दुचाकींना प्रतितास २ ते ४ तर चारचाकींना १० ते २० रुपये शुल्क

शहरातील खासगी वाहनांची संख्या नियंत्रणात राहावी आणि वाहतुकीची कोंडी टाळून रस्ते मोकळे राहावेत, यासाठी शहरातील रस्त्यांवर अहोरात्र पे अ‍ॅण्ड पार्क योजना राबविण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी बहुमताने मंजूर केला.  त्यामुळे रस्त्यावर दुचाकी किंवा चारचाकी वाहन लावण्यासाठी  वाहनचालकांना यापुढे शुल्क द्यावे लागणार आहे. दुचाकीसाठी किमान दोन रुपये ते कमाल चार रुपये प्रतितास तर चारचाकी वाहनांसाठी प्रतितास किमान १० रुपये ते कमाल २० रुपये असे शुल्क मोजावे लागणार आहे. प्रमुख रस्ते आणि उपरस्त्यांवर रात्रीच्या वेळीही पार्किंगसाठी शुल्क मोजावे लागणार आहे.

शहरातील खासगी वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडी, प्रदूषण, अपघातांच्या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पार्किंग धोरण प्रस्तावित केले होते. या धोरणावर गेल्या एक महिन्यापासून सातत्याने चर्चा होत होती. त्यानुसार मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत शुल्क कपात करण्याची उपसूचना देत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध केला. त्यामुळे मतदान घेण्यात आले आणि बहुमताने प्रस्ताव मंजूर करण्यात आला. प्रशासनाच्या प्रस्तावातील शुल्कामध्ये ८० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणाला मदत होईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले. दरम्यान रस्त्यांवरील पे अ‍ॅण्ड पार्क तसेच शुल्क आकारणी राजकीय वादात सापडणार असून त्याला तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.

पार्किंगचे दर असे असतील

पार्किंग धोरणानुसार शहरातील रस्त्यांची अ, ब आणि क अशी विभागणी करण्यात आली होती. अ वर्गवारीतील रस्ते कमी वर्दळीचे, ब वर्गवारीतील रस्ते तुलनेने अधिक वर्दळीचे, तर क वर्गवारीतील रस्ते अती वर्दळीचे असे या विभागणीचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार कमी वर्दळीच्या रस्त्यावरील पार्किंगसाठी दुचाकीला प्रतितास १० रुपये, अधिक वर्दळीच्या रस्त्यासाठी १५ रुपये, तर तीव्र वर्दळीच्या रस्त्यावरील पार्किंगसाठी २० रुपये प्रतितास असे शुल्क निश्चित करण्यात आले होते. स्थायी समितीने या शुल्कात कपात केली असून कमी वर्दळीच्या रस्त्यांवरील पार्किंगसाठी दुचाकींना प्रतितास २ रुपये, अधिक वर्दळीच्या रस्त्यासाठी ३ रुपये तर तीव्र वर्दळीच्या रस्त्यांवरील पार्किंगसाठी ४ रुपये अशा शुल्काला मान्यता दिली आहे. चार चाकी वाहनांसाठी कमी वर्दळीच्या रस्त्यासाठी प्रतितास १० रुपये, अधिक वर्दळीच्या रस्त्यासाठी १५ रुपये तर तीव्र वर्दळीच्या ठिकाणी २० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क अनुक्रमे ५० रुपये, ७५ रुपये आणि १०० रुपये प्रतितास असे प्रस्तावित होते.

रात्रीच्या पार्किंगलाही शुल्क

शहरातील काही इमारती, सोसायटय़ांमधील दुचाकी, चारचाकी वाहने रात्री रस्त्यावर लावण्यात येत असल्यामुळे पार्किंग धोरणात रात्रीही रस्त्यावर वाहने लावण्यासाठी शुल्क आकारणीचे निश्चित  होते. त्यानुसार दुचाकी व चारचाकींना रात्री १० ते सकाळी ८ या कालावधीसाठी ५० रुपये असे शुल्क प्रस्तावित होते. मात्र उपसूचनेद्वारे त्यामध्ये बदल करण्यात आला. त्यामुळे कमी वर्दळीच्या भागात रात्री १० ते सकाळी ८ या कालावधीसाठी १० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. शहरातील पेठा आणि गजबजलेल्या भागात हे शुल्क २५ रुपये असे प्रस्तावित होते. ते ५ रुपये करण्यात आले आहे.

शहरातील १८०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे व्यवस्थापन करणे अवघड आहे. पार्किंग धोरणाच्या निमित्ताने या सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण, दिवस आणि रात्रीच्या वेळेतील पार्किंगची गरज  याचा अभ्यास करूनच रस्त्यांची अ, ब आणि क अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार दर आकारणी होईल.

– कुणाल कुमार, महापालिका आयुक्त