‘दायाद’ हा महेश एलकुंचवार यांचा आवडता शब्द आहे. या शब्दाचा अर्थही त्यांनीच सांगितला आहे. दायाद म्हणजे आधीच्या पिढीने पुढच्या पिढीला केवळ संपत्तीचा वाटा द्यायचा नसतो, तर मूल्यांचा वाटा आणि वारसा द्यायचा असतो. सलग तीन नाटकांच्या निर्मितीचे दस्तावेजीकरण असलेल्या ‘दायाद’चा ठेवा पुणेकरांच्या हाती सुपूर्द करताना आनंद होत आहे. नाटकावर प्रेम केलेत तसेच या दस्तावेजावरही प्रेम कराल, अशी अपेक्षा प्रसिद्ध नाटय़दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी रविवारी व्यक्त केली.

ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार लिखित ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ या नाटय़त्रयीच्या निर्मितीची कथा असलेल्या ‘दायाद’  या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (१८ नोव्हेंबर) मुंबईमध्ये ज्येष्ठ लेखक आणि नाटककार गिरीश कर्नाड यांच्या हस्ते झाले होते. ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ असलेल्या या पुस्तकाचे प्रसिद्ध नाटककार प्रशांत दळवी यांनी संपादन केले आहे. जिगीषा प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ‘वाडा’ नाटय़त्रयीच्या रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे नऊ तासांच्या सलग झालेल्या प्रयोगाचे औचित्य साधून ‘मग्न तळ्याकाठी’ नाटकाच्या प्रारंभी सर्व कलाकारांच्या हस्ते प्रकाशन करून ‘दायाद’चा ठेवा पुणेकरांकडे सुपूर्द करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, पौर्णिमा मनोहर, नेहा जोशी, प्रतिमा जोशी, विनिता शिंदे, भारती पाटील, पूर्वा पवार, अभिनेते वैभव मांगले, राम दौंड, सिद्धार्थ चांदेकर, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, नाटकाचे निर्माते श्रीपाद पद्माकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि पुस्तकाचे संपादक व प्रसिद्ध नाटककार प्रशांत दळवी या वेळी उपस्थित होते. चंद्रकांत कुलकर्णी यांनी रसिकांशी संवाद साधताना या पुस्तकामागची कहाणी उलगडली.

एलकुंचवार यांच्या वाढदिवसाची ९ ऑक्टोबर ही तारीख ध्यानात घेऊन बालगंधर्व रंगमंदिरात नवव्या रांगेतील दहा क्रमांकाच्या खुर्चीवर बसलेल्या भाग्यश्री देव यांना सर्व कलाकारांची स्वाक्षरी असलेली ‘दायाद’ पुस्तकाची प्रत भेट देण्यात आली. सलग नाटय़ाविष्कार अनुभवण्यासाठी त्या धुळ्याहून आल्या होत्या. ‘मी विजया मेहता यांनी दिग्दर्शित केलेले ‘वाडा चिरेबंदी’ पाहिले होते. उद्ध्वस्त करणारा अनुभव होता. ‘वाडा’ आणि ‘मग्न तळ्याकाठी’ ही दोन नाटके पाहिली. आज तिसऱ्यांदा हा अनुभव घेत आहे. माझ्या मराठीत इतकी सुंदर नाटकं नवीन स्वरूपात येत आहेत याचा अभिमान वाटतो’, अशी भावना भाग्यश्री देव यांनी व्यक्त केली.