राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत दिल्यानंतर ३१ डिसेंबर २०२० पूर्वी मुद्रांक शुल्क भरलेल्या नागरिकांना येत्या ३० एप्रिलपर्यंत दस्त नोंदणी करण्याची मुदत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियमांतून नागरिकांना सवलत देण्यात आली असली, तरी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मुद्रांक शुल्कातील सवलत मिळवण्यासाठी गेल्या वर्षी ३१ डिसेंबरपूर्वी मुद्रांक शुल्क भरलेल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी शेवटचे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत.

राज्य सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्क भरलेल्या नागरिकांना मुद्रांक शुल्कामध्ये तीन टक्के  सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्क भरावे आणि त्यानंतरच्या चार महिन्यांत दस्त नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, नोंदणी अधिनियम १९०८ च्या कलम २३ नुसार मुद्रांक शुल्क भरलेल्या दिवसापासून पुढील चार महिन्यांत के व्हाही दस्त नोंदवता येतो. त्यानुसार ३१ डिसेंबरपूर्वी मुद्रांक शुल्क भरणाऱ्या नागरिकांना ३० एप्रिलपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे.

राज्याचे अपर सचिव श्रीरंग घोलप यांनी याबाबत परिपत्रक काढून संबंधित नागरिकांना दिलेल्या कालावधीत दस्त नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. या कालावधीत दस्त नोंदणी न के ल्यास पुढील चार महिन्यांमध्ये दंड भरून दस्त नोंदणी करावी लागणार आहे, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.

तूर्त निर्णय नाही…

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार गेल्या वर्षी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी शहरी भागासाठी तीन टक्के , तर ग्रामीण भागासाठी दोन टक्के  मुद्रांक शुल्क घेण्यात आले. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ पर्यंत शहरी भागात चार टक्के , तर ग्रामीण भागात तीन टक्के  मुद्रांक शुल्क आकारण्यात आले. १ एप्रिलपासून मुद्रांक शुल्क पूर्ववत (शहरी भागासाठी सहा टक्के आणि पाच टक्के ग्रामीण भागासाठी)करण्यात आले आहे. सवलतीच्या काळात मुद्रांक शुल्क भरल्याच्या तारखेपासून पुढील चार महिन्यांत कायद्यानुसार दस्त नोंदवणे संबंधित नागरिकांना बंधनकारक असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने स्पष्ट के ले. याबाबत मुदतवाढ देण्याचा निर्णय अजून तरी घेण्यात आलेला नाही.