डॉ. सुभाष साळुंखे यांचे मत

पुणे : करोनाने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करायची असेल तर त्यासाठी प्रत्येक मृत्यूचे सखोल विश्लेषण होणे अत्यावश्यक आहे, त्यादृष्टीने मुंबईत राबवलेला ‘डेथ अ‍ॅनालिसिस पॅटर्न’ तितक्याच प्रभावीपणे पुण्यातही राबवणे आवश्यक आहे, असे मत राज्याचे निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केले.

करोना विषाणू संसर्गाने मृत्यू होणाऱ्या नागरिकांची शहरातील संख्या सुरुवातीच्या टप्प्यात होती त्या तुलनेत आता नियंत्रणात आहे. शहरातील मृत्युदर एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात कमी झालेला पहायला मिळाला. असे असले तरी मृत्यूची संख्या अद्यापही मोठी आहे.

त्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या रुग्णांचे वैद्यकीय व्यवस्थापन नेमके  काय आणि कशा पद्धतीने केले जाते, त्यात काही त्रुटी राहतात का, या सगळ्याची दैनंदिन स्तरावर नोंद आणि विश्लेषण होण्याची गरज डॉ. साळुंखे यांनी व्यक्त के ली.

डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, पुणे शहरात दगावणाऱ्या मृतांची नोंद पाहिली असता मोठय़ा प्रमाणात रुग्ण हे उशिरा डॉक्टरांकडे किं वा रुग्णालयात येत असल्याचे दिसून येते. रुग्ण दगावण्याचे ते एक प्रमुख कारण नक्की आहे.

मात्र, त्या बरोबरीने रुग्ण उपचारांसाठी दाखल झाल्यापासून ते त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याच्यावर करण्यात आलेले उपचार, प्रकृतीतील चढ-उतार या सगळ्या बाबींची सखोल नोंद ठेवणे आवश्यक आहे. त्यातून रुग्णाचे वैद्यकीय व्यवस्थापन करण्यात काही विलंब होत असल्यास किं वा त्रुटी राहात असल्यास ते ओळखून त्यात सुधारणा करणे शक्य होणार आहे. शहरात वेळोवेळी, ठरावीक टप्प्यांवर हे विश्लेषण केले जातेच, मात्र ते अधिक नियमितपणे, शक्यतो दैनंदिन स्तरावर व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

रॅपिड चाचण्या उपयुक्त, मात्र..

पुणे महापालिके तर्फे  सुरू होत असलेल्या रॅपिड अँटिजेन चाचण्या लवकरात लवकर संसर्गाचे निदान होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.त्यामुळे बाधित रुग्णाचे वैद्यकीय व्यवस्थापनही तत्काळ होऊ शके ल, मात्र विशिष्ट रुग्णाला लक्षणे आहेत, मात्र अँटिजेन चाचणीत बाधा नाही असे दिसल्यास आरटी-पीसीआर अर्थात स्वॅब चाचणी करून त्यावर शिक्कामोर्तब करावे लागेल, असा सावधगिरीचा इशाराही डॉ. साळुंखे यांनी दिला.