23 November 2017

News Flash

भुशी डॅमच्या डोंगरावरून पाय घसरल्यानं २३ वर्षीय तरूणाचा मृत्यू

भुशी धरणात भिजण्यासाठी गेलेले काही पर्यटक अडकले

लोणावळा | Updated: July 16, 2017 8:11 PM

भुशी डॅमच्या पायऱ्यांवर बसण्यास मनाई

लोणावळ्यातला भुशी डॅम हा अनेक पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. मात्र याच भुशी धरणाच्या डोंगरावरून पाय घसरल्यानं संतोष सोनकांबळे या तरूणाचा मृत्यू झाला आहे. लोणावळ्यातल्या भुशी धरणावर पर्यटनासाठी संतोष सोनकांबळे हा २३ वर्षांचा तरूण आला होता. भुशी धरणाच्या मागच्या डोंगरावर चढताना त्याचा तोल गेला, त्यानंतर त्याचं डोकं एका दगडावर आपटलं. यानंतर संतोषला तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

दुसरीकडे भुशी डॅमवर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना वाहतूक कोंडीमध्ये अडकावं लागलं आहे. रविवार असल्यानं या धरणावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. वाहनांच्या ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा दिसून आल्या. यावेळी अनेक पर्यटक हुल्लडबाजीही करत असल्याचं समोर आलं आहे.

पर्यटक भुशी धरणाच्या दिशेनं जाण्यासाठी आणि तिथून परतण्यासाठी स्वतःकडे असलेल्या गाडीचा वापर करत आहेत, मात्र कोणतंही सहकार्य न करता हुल्लडबाजी करत आहेत त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे. या सगळ्यांना मार्गी लावताना पोलिसांना अक्षरशः नाकी नऊ आले आहेत.

लोणावळ्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे भुशी डॅम भरून वाहू लागला आहे. या ठिकाणी येऊन पावसाळा साजरा करण्यासाठी येतात. सुरक्षेचा उपाय म्हणून शनिवारपासूनच पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसण्यास मनाई करण्यात आली आहे. याचमुळे काही अति उत्साही पर्यटक भुशी धरणाच्या मागच्या बाजूनं डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रयत्नात संतोष सोनकांबळे हा तरूणही होता, मात्र याच प्रयत्नात त्याचा जीव गेला आहे अशी माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे.

कोणतंही पर्यटनाचं ठिकाण असो, तिथे जाऊन मजा करणं हे पर्यटकांचं पहिलं काम असतं. यामध्ये काही गैरही नाही पण अनेकदा पर्यटकांचा अति उत्साह त्यांना संकटात टाकतो. पुण्याजवळच्या लोणावळ्यात असलेला भुशी डॅम या ठिकाणी अनेकदा वाहतूक कोंडीसारखे प्रकार घडतात. तसंच काही पर्यटक अति उत्साहाच्या नादात पाण्यात अडकल्याचीही घटना याआधी घडली आहे. आता पायऱ्यांवर बसण्यास मज्जाव केल्यानं डोंगरावर चढण्याची हौस अनेकजण पूर्ण करताना दिसत आहेत. मात्र अशाच उत्साहाच्या भरात संतोष सोनकांबळे या पर्यटकाचा मृत्यू झाला आहे.

संतोष सोनकांबळेच्या मृत्यूचं उदाहरण पाहून निदान आता तरी भुशी धरणाच्या डोंगरावर चढण्याचे अति उत्साही प्रकार तरूण पर्यटक थांबवतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.

First Published on July 16, 2017 8:05 pm

Web Title: death of a 23 year old man after falling from the hill of bhushi dam