‘आपल्याला नायक का लागतात?’, ‘जगण्याचं मनोरंजनीकरण होतय का?’, ‘सामाजिक चळवळींचे राजकीय परिणाम’, ‘जागतिकीकरणात देश ही संकल्पना किती समर्पक’ आणि ‘अतिसंपर्काने काय साधले’ हे पाच विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते. यात ‘नायक का लागतात’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न सर्वाधिक स्पर्धकांनी केला. त्याखालोखाल ‘सामाजिक चळवळींचे राजकीय परिणाम’ हा विषय लोकप्रिय ठरला. प्रत्येक विषयावर स्पर्धकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केली. त्याद्वारे या महत्त्वाच्या विषयांबाबत आजची तरुणाई कशी व्यक्त होते, हे पाहायला मिळाले. या वक्तयांनी मांडलेली मते एकत्रितपणे त्यांच्याच शब्दांत..

‘आपल्याला नायक का लागतात?’
प्रत्येकाचा नायक वेगळा असतो. ही व्यक्तिसापेक्ष कल्पना आहे. नायक म्हणजे एखादीच व्यक्ती नाही, तर एखादी घटना किंवा एखादी वृत्तीही नायक ठरू शकते. आम्हाला नेते नाहीत, तर नायक हवे असतात. आम्हाला अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता असलेला किंवा सर्व काही शक्य करण्याची स्वप्न दाखवणारा अशीच आमची नायकाबाबतची अपेक्षा असते.
अंधानुकरण हा आमचा स्थायिभाव होत चालला आहे. त्यातून नव्या नायकांचा जन्म होतो आणि त्यांना मान्यताही मिळते. नायकांना देव्हाऱ्यात बसवले जाते. आम्ही व्यक्तिपूजक होत चाललो आहोत. नायकांना देव्हाऱ्यात बसवून आम्ही विचार करणे टाळतो आहोत. त्यामुळे कदाचित क्षमता असूनही आमच्यातून नायक तयार होत नाहीत, तर आम्ही कायम नव्या नायकांच्या शोधात राहतो.
दिशा दाखवायला नायक हवेत. मात्र, आम्हाला नायक का लागतो याचबरोबर आमच्यासाठी तो नायक का ठरला, हेही महत्त्वाचे आहे. नायकांचीही चिकित्सा व्हायला हवी.

‘जगण्याचं मनोरंजनीकरण होतंय का?’
मनोरंजनाची गरज ही फक्त आजच्या माणसाची संकल्पना नाही. ती पूर्वीपासून आहे. ज्या वेळी माणसाला ‘कंटाळा’ ही भावना कळली, तेव्हाच मनोरंजन ही संकल्पना उदयाला आली असावी. मात्र, हळूहळू मनोरंजन ही प्राथमिक गरज असल्याचे चित्र निर्माण झाले, कारण मनोरंजनाचे व्यावसायिकीकरण झाले. त्यातून मनोरंजनाचे नवे- नवे पर्याय आणि साधने समोर आली. त्याचा अतिरेकही होत असल्याचे अनेकदा दिसून येते. एखाद्याचा मृत्यूही आमच्यासाठी मनोरंजन ठरतो आहे, हे गंभीर आहे. प्रसारमाध्यमांनी जगण्याचे मनोरंजनीकरण केले.
परिवर्तनाच्या वेगात मनोरंजनाची साधने आणि संकल्पना बदलत गेल्या. सध्याचे मनोरंजन अश्लीलतेकडे झुकते आहे. सध्या मनोरंजन हा जगण्याचा एक भाग राहिला नसून, मनोरंजनासाठी जगणं असे नवे समीकरण समोर येते आहे.
माझ्या जगण्याचा टीव्ही, लॅपटॉप, मोबाइल किंवा मॉल झालाय! मी या सगळ्यात आहे, पण माझं मन त्यात कुठेच नाही! याला ‘स्यूडो मनोरंजन’ म्हणावंसं वाटतं. यापुढे कदाचित सृजनशीलता मारून टाकणारी माध्यमे आपला अंमल गाजवतील आणि व्यावसायिकतेला सोडून असलेला माणसाचा भागच कदाचित नष्ट होईल!  

‘सामाजिक चळवळीचे राजकीय परिणाम’
हक्क आणि अधिकारांची भाषा करणाऱ्या चळवळींना राजकीय बाजू असतेच, प्रबोधन आणि परिवर्तनाच्या चळवळींना सामाजिक म्हणता येईल. सामजिक असंतोषातून, वंचिततेच्या भावनेतून चळवळी निर्माण होतात. सामाजिक हित हाच चळवळींचा गाभा होता. अस्तित्वासाठी सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या. राजकीय व्यवस्थेवर चळवळी नक्कीच परिणाम करतात. आपला इतिहासही आपल्याला हेच सांगतो. विद्यार्थी चळवळी, जाती निर्मूलनाच्या चळवळी यांनी यापूर्वी राजकीय व्यवस्थेतही परिणाम घडवला आहे.
चळवळींचा स्वार्थासाठी वापर होताना दिसत आहे. मतांच्या राजकारणासाठी चळवळी हे साधन म्हणून वापरण्यात येत आहे. कोणत्याही चळवळीचा राजकीय नफा-तोटा किती याच्या गणितांवर त्या चळवळीला आलेले यश काही प्रमाणात तरी अवलंबून असते. आरक्षणासारखे मुद्दे हे सामाजिक स्वाथ्यासाठी योग्य की अयोग्य, यापेक्षा त्यांचा राजकीय साधन म्हणून वापर होताना दिसत आहे. नजीकच्या काळातील सामाजिक चळवळी आणि सरकारचा विजय हे सामाजिक चळवळींच्या राजकीय परिणामाचे एक उदाहरण म्हणता येऊ शकेल. मात्र, नजीकच्या काळातील सामाजिक चळवळी राजकीय ‘मार्केटिंग’ करण्यात कमी पडल्या. सामाजिक चळवळीतील नेतेही राजकीय आश्रय घेताना दिसतात, तेव्हा सामाजिक चळवळींच्या खरेपणाबाबतही शंका उपस्थित होते. चळवळीच्या नेतृत्वाला सत्तेत वाटा देऊन चळवळीपासून बाजूला करायचे म्हणजे चळवळीची धार बोथट होते हेही अनेकदा दिसले आहे.
या सर्व गोष्टींमधून सामाजिक नैराश्यातून बाहेर काढण्यासाठीही पुन्हा चळवळ उभी राहाणे हाच पर्याय असेल.

जागतिकीकरणात देश ही संकल्पना किती समर्पक
एकमेकांच्या सहकार्याशिवाय आपण जगू शकत नाही, हे सगळ्याच देशांनी ओळखले आणि त्यातून जागतिकीकरणाच्या संकल्पनेला महत्त्व आले. या संकल्पनेत देश ही संकल्पना वाहून जाईल, अशी भावनाही तयार झाली. ‘जागतिकीकरण’ कसे जगायचे हेही कळायला हवे. ‘वन वर्ल्ड’कडे जाण्यासाठी अजून आपण परिपक्व नाही. वेगळ्या विदर्भाचा तिढा आपण सोडवू शकलेलो नाही, पण गप्पा मात्र जागतिकीकरणाच्या करतो आहोत!
आता पुन्हा एकदा देश या संकल्पनेकडे जगाचा प्रवास सुरू झाला आहे. युरोपियन राष्ट्रांनी युरोपियन युनियन सारख्या संघटनेतून बाहेर पडण्याचा विचार सुरू केला आहे. या देशांनी बहुसांस्कृतिकत्व नाकारले आहे. देश ही संकल्पना संस्कृती आणि जीवनशैली देते. जागतिकीकरणाने संस्कृतीत काही अंशी साधम्र्य निर्माण केले, जीवनशैलीतही ते परावर्तित झाले. मात्र, ज्या वेळी अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला, तेव्हा देश हीच संकल्पना जवळची वाटल्याचे दाखले दिसून येतात. आपल्या हक्काची, अस्तित्वाची आणि त्यातून निर्माण झालेल्या अस्मितेची जाणीव ही कायम राहीलच आणि त्यामुळेच देश ही संकल्पनाही टिकून राहील.
जागतिकीकरणात देश ही संकल्पना किती समर्पक यापेक्षाही स्वाभाविक की अस्वाभाविक असा विचार करणे योग्य ठरेल. देश ही संकल्पना अजून तरी स्वाभाविक म्हणावी लागेल. सध्या आर्थिक विकास, साधन संपत्तीचा वापर आणि संस्कृती हे मुद्दे ‘देश’ या संकल्पनेच्या मागे उभे आहेत. जागतिकीकरण ही संधी आहे. मात्र, त्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी देश ही संकल्पना टिकणे आवश्यक आहे.

‘अतिसंपर्काने काय साधले?’
सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आम्हाला प्रत्येक गोष्टीचा ‘अपडेट’ सोशल माध्यमांमधूनच मिळतो. खऱ्या जगातली नाती आणि संपर्क या आभासी जगातल्या अतिसंपर्कामुळे फिके वाटू लागले आहेत. खऱ्या जगात कुणीही कितीही आरडाओरडा केला, तरी त्याचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही!
माझा ‘भावनिक कोशंट’ कमी होतोय बहुदा! प्रत्येकानं अतिसंपर्काची आपली मर्यादा ओळखण्याची वेळ आलीय हेच खरं!
चांगलं ऐका.. चांगलं वाचा.. स्वत:चा विचार करा!
– परीक्षकांचा स्पर्धकांना गुरुमंत्र
 चांगलं ऐका, चांगलं वाचा आणि स्वत:चा विचार करा, असा सल्ला परीक्षकांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘वक्तृत्व स्पर्धाची संख्या कमी झाली आहे. मात्र, सध्या काही मांडू इच्छिणाऱ्या तरुणाईला एका व्यासपीठाचीही गरज आहे, अशावेळी नाथे प्रस्तुत आणि पृथ्वी एडीफाईस यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेने विद्यार्थ्यांना एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे,’ असे मत परीक्षकांनी व्यक्त केले.
डॉ. गणेश राऊत
‘‘लोकसत्ताचा उपक्रम चांगला आहे. विद्यार्थ्यांना अशा स्पर्धामध्ये सहभागी व्हावेसे वाटते आहे, ही खरच एक सकारात्मक गोष्ट आहे. स्पर्धेचे विषेय विद्यार्थ्यांच्या बुद्धीला खाद्य देणारे आणि विचार करायला लावणारे होते. मात्र, विद्यार्थ्यांनी अधिक गांभीर्याने तयारी करायला हवी. मात्र, ही स्पर्धा दरवर्षी घेतली जावी.’’
डॉ. समीरण वाळवेकर
‘‘पूर्वी राज्यात वर्षांला साधारण दीडशे स्पर्धा व्हायच्या. आता जेमतेम २० ते २५ स्पर्धा होत असाव्यात. व्यक्त होणे, विचार करण्याची सवय ही, विषयांची खोली जाणून घेण्याची सवय ही अशा स्पर्धामधून होते. त्यामुळे वक्तृत्व स्पर्धा झाल्याच पाहिजेत. वक्तृत्व हे सादरीकरण असते, त्या नुसत्याच गप्पा असू नयेत. त्यामुळे उभे राहण्याची पद्धत, हावभाव यांचाही जागरूकपणे विचार करणे आवश्यक आहे.’’
नीलिमा बोरवणकर
‘‘विषय विद्यार्थ्यांना जवळचे वाटावेत, असे होते. मात्र, त्यावरचा विद्यार्थ्यांचा विचार कमी पडला. मुळात सध्या ऐकणे कमी झाले आहे. त्याचाही परिणाम जाणवला. चांगले एकून आवाज, उच्चार, हावभाव, पॉझ आणि एकूण शैली यांची जाणीव अधिक चांगली होत जाते. त्यामुळे स्पर्धेइतकीच वक्तृत्वाच्या कार्यशाळा घेण्याची आवश्यकता आहे. भाषेच्या वापराबाबतही अधिक
गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.’’
उज्ज्वला बर्वे
‘‘विषय समजावून घेऊन स्पर्धकाने त्याचा अभ्यास करावा, ताजी माहिती मिळवावी अशी वक्तृत्व स्पर्धाची अपेक्षा असते. मुलांमध्ये माहिती संकलन आणि विश्लेषणाची आवड निर्माण करणे असा असतो. ज्यांची निवड झाली ते स्पर्धक उत्तम आहेतच पण ज्यांना स्पर्धाचा फारसा सराव नव्हता त्या विद्यार्थ्यांचा प्रयत्नही उल्लेखनीय वाटला. अशा विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळणे गरजेचे असते. अनेक स्पर्धकांची मराठीतून व्यक्त होण्याची हातोटी चांगली वाटली.’’
संमेलन भरले वक्तयांचे!
कुणी आपल्या भाषणाचे मुद्दे पुन:पुन्हा वाचून पाहते आहे, कुणी नव्याने सुचलेले मुद्दे नोंदवते आहे तर कुणी अगदी लक्ष देऊन समोरच्या वक्तयाचे भाषण ऐकते आहे.. अशा खेळीमेळीच्या वातावरणात शुक्रवारी वक्तयांचे संमेलन रंगले! विषयांच्या वेगळ्या मांडणीवर श्रोत्यांच्या टाळ्यांची मिळालेली उत्स्फूर्त दाद आणि बोलण्याच्या वेगवेगळ्या शैलींनी जिंकलेली मने हेच चित्र या स्पर्धेत दिसून आले. काहींनी स्वत: केलेल्या कवितांचा वापर करून भाषणे रंगवली, काहींनी आपल्या विचारांना गोष्टींचे संदर्भ दिले. मोठमोठय़ा व्यक्तींची विधाने उद्धृत करण्यासही अनेकांनी प्राधान्य दिले. बहुतेक वक्ते आपले भाषण झाल्यानंतरही पूर्ण वेळ थांबून इतरांची भाषणे ऐकत होते,  सोबतच त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे टिपूनही घेत होते.