मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलिसांवर आरोप

पुणे : कर्जबाजारी झालेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत पोलिसांवर आरोप केले आहेत. दरम्यान, तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून एकाला अटक करण्यात आली आहे.

स्वप्नील दशरथ सपकाळ (वय ३३, रा. गोंधळेनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सपकाळने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी (सुसाईड नोट) मध्ये पोलिसांवर आरोप केले आहेत. या चिठ्ठीत हडपसर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक तसेच सहायक निरीक्षकाचे नाव लिहिले असून त्यांच्यावर कारवाई करा, असे सपकाळ याने चिठ्ठीत नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणात सपकाळ याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन राजेंद्र बाळासाहेब मोरे (रा. फुरसुंगी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मोरेने सपकाळ याच्याकडून जमीन विकत घेतली होती. या प्रकरणात धनादेश वटले नव्हते. त्यामुळे सपकाळने मोरे विरोधात तक्रार दिली होती. पोलिसांनी हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याने न्यायालयात तक्रार करा, असे सांगितले होते. तेव्हापासून सपकाळ नैराश्यात होता. गुन्हा दाखल न करता पोलिसांनी मोरेकडून पैसे मिळवून द्यावेत, असा अर्ज सपकाळ याने दिला होता. त्यासाठी तो पोलिसांकडे पाठपुरावा करत होता.

सपकाळ याने पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद केल्यानंतर या प्रकरणाची परिमंडल पाचचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी चौकशी सुरू केली आहे.