‘डेक्कन क्वीन’मधील खाद्यपदार्थात आळीप्रकरणी अखेर दंड

पुणे- मुंबई दरम्यानची सर्वात महत्त्वाची गाडी असलेल्या डेक्कन क्वीनमधील खाद्यपदार्थात आळ्या आढळल्याच्या तक्रारीनंतर संबंधित ठेकेदाराला दंडाची शिक्षा करण्यात आली असली, तरी खानपान व्यवस्थेवर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. प्रवाशांना योग्य दर्जाने खानपान रेल्वेत मिळावे याची जबाबदारी आणि देखरेख ठेवण्याची जबाबदारी इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कार्पोरेशनची (आयआरसीटीसी) आहे. मात्र, ही यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.

पुणे- मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये डायनिंग कारच्या माध्यमातून प्रवाशांना खानपान व्यवस्था देण्यात येते. पूर्वी ही व्यवस्था रेल्वे सांभाळत होती. मात्र, सध्या ही डायिनग कार ठेकेदाराला चालविण्यासाठी देण्यात आली आहे. तेव्हापासून खानपानाविषयी विविध तक्रारी सुरू झाल्या आहेत. पुण्यातून लांब पल्ल्यावर जाणाऱ्या विविध गाडय़ांमध्येही पेंट्री कारच्या माध्यमातून खानपान पुरविण्यात येते. त्याबाबही सातत्याने तक्रारी येत असल्याचे प्रवासी संघटनांकडून सांगण्यात येत आहे. पुढील काळात पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या आणि दोन मोठय़ा शहरांना जोडणाऱ्या प्रत्येक इंटरसिटी गाडय़ांमध्ये प्रवाशांना खानपान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर या व्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणेवर अंकुश ठेवण्याची गरज असल्याचे मत प्रवासी व्यक्त करीत आहेत.

गाडीमध्ये ठेकेदारांकडून देण्यात येणाऱ्या खानपानाचा दर्जा तपासणे, प्रवाशांची तक्रार आल्यास त्याच्याशी चर्चा करून तक्रार नोंदवून घेणे आदी कामांसाठी पेंट्री कार किंवा डायनिंग कार असलेल्या प्रत्येक गाडीमध्ये आसआरसीटीसीचा कर्मचारी बंधनकारक आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्याला प्रत्येक दिवसाला वेतनाशिवाय ५६० रुपये भत्ता आणि मोफत खानपान मिळते. या कर्मचाऱ्याने गणवेश घालणे आणि त्यावर ओळखपत्र लावणेही सक्तीचे आहे. वस्तुस्थिती लक्षात घेता असा कोणताही कर्मचारी प्रवाशांना गाडीत दिसत नाही. खानपानाविषयी तक्रार करायची झाल्यास ती कोणाकडे करायची असा प्रश्न प्रवाशांपुढे निर्माण होतो. त्यामुळे ठेकेदारांची अरेरावी कायम राहते. डेक्कन क्वीनमध्ये काही दिवसांपासून प्रवाशाच्या आमलेटमध्ये किडे आढळून आले होते. त्यावेळीही संबंधित कर्मचाऱ्याकडून प्रवाशाला योग्य मदत मिळू शकली नाही. काही वेळेला मनमानी पद्धतीने खाद्यपदार्थाचे दर आकारले जातात. त्यावेळीही आयआरसीटीसीचा कर्मचारी प्रवाशांच्या मदतीला येत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.

डेक्कन क्वीनमधील खाद्यपदार्थात आळ्या आढळल्याच्या तक्रारीनंतर संबंधित ठेकेदाराला दंड करण्यात आला. मात्र, खाद्यपदार्थाच्या दर्जाची तपासणी करण्याची जबाबदारी असलेल्या आयआरसीटीसीच्या कर्मचाऱ्याला कोणतीही शिक्षा झाली नाही. ठेकेदारासह त्यालाही शिक्षा अपेक्षित आहे, अन्यथा सातत्याने असे प्रकार होत राहतील. आयआरसीटीसीच्या कर्मचाऱ्यांचा ठेकेदार आणि त्याच्याकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाच्या दर्जावर अंकुश आवश्यक आहे. परंतु, हे कर्मचारी रेल्वेत दिसतच नाहीत. त्यामुळे ठेकेदार मोकाट असल्याची वस्तुस्थिती आहे. – हर्षां शहा, अध्यक्षा रेल्वे प्रवासी ग्रुप