फुलांच्या माळांनी सजविलेले इंजिन.. प्रवाशांच्या चेहऱ्यावरील अमाप उत्साह.. रेल्वे स्थानकावर रंगलेली नृत्य व गाण्यांची मैफल.. निमित्त होते मुंबई- पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लाडक्या डेक्कन क्वीनच्या वाढदिवसाचे. ८३ व्या वर्षांनिमित्त ८३ किलोचा केक कापून प्रवाशांनी मोठय़ा जल्लोषात हा वाढदिवस साजरा केला.
पुणे विभागाची ही गाडी ८३ वर्षांपासून अविरत सेवा देत आहे. प्रत्येक वर्षी या गाडीचा वाढदिवस प्रवाशांकडून साजरा केला जातो. मात्र, यंदा वाढदिवसाचा उत्साह काही निराळाच होता. प्रवाशांबरोबरच विद्यार्थीही वाढदिवसाच्या या आनंदात सहभागी झाले होते. वाढदिवस साजरा करण्यासाठी सकाळी सहापासूनच पुणे रेल्वे स्थानकाच्या पहिल्या क्रमांकाच्या फलाटावर प्रवाशांची गर्दी झाली होती. सकाळी गाडी फलाटावर येताच प्रवाशांनी एकच जल्लोष केला. गाडीचे इंजिन फुलांनी सजविण्यात आले होते. फलाटावरील व गाडीतील प्रवाशांच्या चेहऱ्यावर वाढदिवसाचा अमाप उत्साह दिसून येत होता.
सकाळी साडेसहाच्या सुमारास गाडीच्या इंजिनची पूजा करण्यात आली. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षां शहा, गाडीचे चालक बी. एम. भरद्वाज तसेच अनिल दामले आदी त्या वेळी उपस्थित होते. दादासाहेब तोरणे यांचे चिरंजिव अनिल तोरणे हे पूर्वी रेल्वेचे चालक होते. गाडीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहा यांच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला. वाढदिवसानिमित्त तयार करण्यात आलेला ८३ किलोचा केक कापण्यात आला. गाडी रवाना होताना मंकी हिल येथे माकडांना खाऊ घालण्यासाठी गाडीसोबत केळीही देण्यात आली. वाल्टाझ म्युझिक अकादमीच्या विद्यार्थ्यांनीही वाढदिवसाच्या या कार्यक्रमात सहभाग घेतला. डेक्कन क्वीनवर तयार केलेले गाणे या वेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. नृत्याचा कार्यक्रमही या वेळी सादर करण्यात आला. त्यामुळे स्थानकावर सकाळी उत्साहाचे वातावरण होते.