पोलीस निरीक्षकाच्या पत्नीने खोटे संमतीपत्र तयार करून चाकण येथील शेतकऱ्यांची लाखो रुपयांची जमीन बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे, मात्र याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. विशेष म्हणजे ज्या ग्रामीण पोलिसांकडे ही तक्रार दिली आहे, तिथल्या आर्थिक गुन्हे शाखेत संबंधित महिलेचे पती कार्यरत असल्याने गुन्ह्य़ाचा तपास योग्य रीतीने होईल का, याबाबत शेतकऱ्यांनी साशंकता व्यक्त केली आहे.
पुणे ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बलराज लंजिले यांच्या पत्नी कविता लंजिले यांनी अशा प्रकारे जमीन बळकावल्याची तक्रार देण्यात आली आहे. याबाबत पुणे ग्रामीण पोलीस उपअधीक्षक शंकरराव जाधव चौकशी करत आहेत. कविता लंजिले यांच्याबरोबरच त्यांचे भागीदार डॉ. चारुदत्त जोशी तसेच, या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करण्यास मदत करणारे श्रुती कन्स्ट्रक्शनचे दीपक जैन, देहूरोडचे नोटरी अॅड. कृष्णा शंकरराव दाभोळे आणि आर्किटेक्ट सुहास गोरे यांच्याविरुद्धही तक्रार देण्यात आली आहे.
पानसरे व इतर शेतकऱ्यांची जमीन चाकण-शिक्रापूर रस्त्यावर आहे. ती शहराच्या हद्दीत येत असल्याने त्यांची जमीन बिगरकृषक करण्यासाठी नकाशे पाहण्यासाठी ते गेले होते. त्या वेळी त्यांना समजले की त्यांच्या जमिनीतून रस्ता जात आहे. त्यांनी माहितीच्या अधिकारात कागदपत्रे मिळवली, तेव्हा समजले की त्यांची जमीन रस्त्यासाठी देण्याचे संमतीपत्र २००८ साली परस्पर तयार करण्यात आले होते. त्यांच्या जमिनीच्या लगतच कविता लंजिले व जोशी यांची जमीन आहे. त्यावर बांधकाम प्रकल्प सुरू करण्यात येत होता. त्यासाठी रस्ता म्हणून पानसरे यांची जमीन देण्यात आल्याचे कागदपत्रे दाखवत होती. त्यासाठी तयार केलेले प्रतिज्ञापत्र बनावट असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. हयात नसलेल्या व्यक्तीच्या सह्य़ा आणि अनेक खोटय़ा गोष्टी त्यात होत्या.
या सर्व कागदपत्रांसह पानसरे व इतर शेतकऱ्यांनीपंधरा दिवसांपूर्वी म्हणजे १५ मार्च रोजी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली. मात्र, त्याबाबत अजूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कविता यांचे पती बलराज लंजिले हे तिथेच आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी योग्य पद्धतीने होणार का, याबाबत पानसरे व इतर शेतकऱ्यांनी ‘लोकसत्ता’ शो बोलताना शंका व्यक्त केली.