घाऊक बाजारात ४०० ते ५५० लिंबांची गोणी १०० ते १५० रुपयांना

पुणे : अवेळी झालेल्या पावसामुळे दोन महिन्यांपूर्वी लिंबाच्या लागवडीवर परिणाम झाला होता. पावसाने उघडीप दिल्यानंतर गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात लिंबांची आवक मोठय़ा प्रमाणावर सुरू झाली आहे. एकीकडे आवक वाढत असली तरी लिंबांना मागणी नसल्याने दरातही मोठी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात एका लिंबाला ४० ते ५० पैसे असा दर मिळाला असून किरकोळ बाजारात दहा रुपयांत सात ते आठ लिंबांचा वाटा मिळत आहे.

अवेळी झालेल्या पावसामुळे दोन महिन्यांपूर्वी लिंबांचे नुकसान झाले होते. त्यावेळी  लिंबांच्या एका गोणीचा दर ५०० ते ९०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. एका गोणीत प्रतवारी तसेच आकारमानानुसार ४०० ते ५५० लिंबे बसतात. गेल्या काही दिवसांपासून बाजारात लिंबांची आवक वाढली असून सात ते आठ हजार गोणी लिंबांची आवक दोन दिवसांपूर्वी झाली. सध्या लिंबांना विशेष मागणी नाही. त्यामुळे सध्या लिंबांचे दर उतरले आहेत. घाऊक बाजारात एका लिंबाला ४० ते ५० पैसे असा दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात लिंबांच्या वाटय़ाची विक्री दहा रुपयांना केली जात असून एका वाटय़ात साधारणपणे सात ते आठ लिंबे बसतात, अशी माहिती फळबाजारातील लिंबांचे व्यापारी रोहन जाधव यांनी दिली.

यंदा पावसाने उघडीप दिली नाही. त्यामुळे लिंबांच्या प्रतवारीवर परिणाम झाला होता. दोन महिन्यांपूर्वी बाजारात लिंबाचा तुटवडा निर्माण झाला होता. लिंबांची लागवड नगर जिल्ह्य़ातील राशिन, सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शी भागातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर करतात. चांगल्या प्रतीच्या लिंबांना दोन महिन्यांपूर्वी दर मिळाले होते. आता मात्र लिंबांच्या दरात घसरण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची निराशा

सध्या घाऊक बाजारात ४०० ते ५५० लिंबांच्या एका गोणीला १०० ते १५० रुपये असे दर मिळत असून दोन महिन्यांपूर्वी गोणीचे दर ५०० ते ९०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यावेळी लिंबू उत्पादक शेतक ऱ्यांना चांगले दर मिळाले होते. दोन महिन्यानंतर चित्र पालटले असून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. लिंबांना मिळालेले दर पाहता वाहतूक खर्च, उत्पादन खर्च भागवणे शेतकऱ्यांना शक्य नाही.

दरवर्षी थंडीत लिंबांना मागणी नसते. थंडी आणि पावसाळ्यात लोणचे उत्पादकांकडून लिंबांची मोठय़ा प्रमाणावर खरेदी के ली जाते. फेब्रुवारी ते मे दरम्यान लिंबांच्या मागणीत वाढ होते. त्यावेळी लिंबांचे दर तेजीत असतात.

– रोहन जाधव, लिंबू व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड फळबाजार