दर्जा आणि गुणवत्तेच्या निकषांवर बंद झालेल्या ३२० शिक्षणसंस्थांमुळे यंदा  देशभरात अभियांत्रिकी पदवी-पदविका, वास्तुकला, हॉटेल मॅनेजमेंट आदी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या सुमारे दोन लाख जागा कमी झाल्या आहेत.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) संकेतस्थळावर देण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठीच्या आकडेवारीवरून हे चित्र समोर आले आहे.

गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीचा आढावा घेतला असता संस्थांची संख्या वाढत असताना जागांची संख्या मात्र कमी होत असल्याचे दिसून येत होते. गेल्या काही वर्षांत तंत्रशिक्षणाच्या संस्था मोठय़ा प्रमाणात वाढल्या. मात्र अभियांत्रिकी पदवी-पदविका अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होऊ लागल्याने अभियांत्रिकी संस्थांमधील जागा मोठय़ा प्रमाणात रिक्त राहत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. परिणामी संस्थांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर यंदा देशभरातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्थांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी होऊन ती दहा हजारांच्या आत आली आहे.

झाले काय?

देशभरातील तंत्रशिक्षण संस्थांवर एआयसीटीईचे नियंत्रण असते. यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठी ९ हजार ६७२ संस्थांमध्ये ३० लाख ८६ हजार २२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १ हजार ३२० संस्था कमी झाल्या आहेत, तर १ लाख ९८ हजार ९९६ जागा कमी झाल्या आहेत.

अनेक खासगी महाविद्यालये, अभिमत विद्यापीठांमध्ये गरजेपेक्षा जास्त जागा होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तुलनेत संस्थांमधील जागांचे प्रमाण प्रचंड होते. त्यामुळे देशभरातील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये गेली काही वर्षे जवळपास ५० टक्के  जागा रिक्त राहत होत्या. मागणीपेक्षा पुरवठा जास्त अशी परिस्थिती होती. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचाही मोठा प्रश्न होता. त्यामुळे गुणवत्ता नसल्याने, प्रवेश होत नसल्याने शिक्षण संस्था स्वत:हूनच बंद होत आहेत. म्हणून जागाही कमी होत आहेत.

– डॉ. अनिल सहस्रबुद्धे, अध्यक्ष, एआयसीटीई

वर्ष संस्था  प्रवेशाच्या जागा

२०२०-२१ ९ हजार ६७२ ३० लाख ८६ हजार २२

२०१९-२० १० हजार ९९२   ३२ लाख ८५ हजार १८

२०१८-१९ १० हजार ४२८   ३३ लाख ९२ हजार ४८५

२०१७-१८ १० हजार ३९८   ३५ लाख ५१ हजार ९५७