वैद्यकीय प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा ‘नीट’ आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा ‘जेईई मेन्स’ देणारे सर्वाधिक परीक्षार्थी महाराष्ट्रातील आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत जेईई मेन्स देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २९ हजारांनी कमी झाली असून, नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सुमारे ११ हजारांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनटीए) जाहीर केलेल्या देशभरातील परीक्षार्थीच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जेईई मेन्स १ ते ६ सप्टेंबरदरम्यान, तर नीट १३ सप्टेंबरला होणार आहे. देशभरातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांत  महाराष्ट्राखालोखाल उत्तर प्रदेश, तामिळनाडू या राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

गेल्यावर्षी जेईई मेन्ससाठी १ लाख ३९ हजार ७४६ परीक्षार्थी होते, यंदा १ लाख १० हजार ३१३ विद्यार्थीनी नोंदणी केली आहे. तर गेल्यावर्षी २ लाख १७ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी नीट दिली होती, तर यंदा २ लाख २८ हजार ९१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

गेल्यावर्षी जेईई मेन्ससाठी राज्यात ७९ केंद्रे होती, तर यंदा ७४ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. तसेच गेल्यावर्षी नीटसाठी राज्यात ४४३ केंद्रे होती, तर यंदा ६१५ केंद्रांवर होणार आहे. त्यामुळे जेईई मेन्सची परीक्षा केंद्रे कमी झाली असून, वाढलेल्या विद्यार्थी संख्येमुळे नीटची परीक्षा केंद्रे वाढली आहेत.