News Flash

महागाईमुळे ‘पोषण’ घटले

देशातील वाढत्या महागाईमुळे ‘पौष्टिक’ अन्नपदार्थाच्या खरेदीवर परिणाम झाला असून फळे, भाज्या, दूध, डाळी, मासे खरेदी करण्याचे प्रमाण ४० टक्क्य़ांपयर्ंत घटले आहे.

| December 3, 2013 02:55 am

देशातील वाढत्या महागाईमुळे ‘पौष्टिक’ अन्नपदार्थाच्या खरेदीवर परिणाम झाला असून फळे, भाज्या, दूध, डाळी, मासे खरेदी करण्याचे प्रमाण ४० टक्क्य़ांपयर्ंत घटले असल्याचे असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इन्डस्ट्रीज (असोचम) ने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षण अहवालामधून पुढे येत आहे.
देशातील वाढत्या महागाईचा परिणाम पौष्टिक पदार्थाच्या खरेदीवर झाला आहे. शिक्षण, आरोग्य सुविधा, प्रवास, निवारा अशा आवश्यक बाबींच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. त्याच वेळी फळे, भाज्या, डाळी, दूध, मासे, अंडी या पौष्टिक खाद्यपदार्थाच्याही किमती वाढल्या आहेत. त्यामुळे महिन्याच्या घरखर्चाचा समतोल साधण्यासाठी देशातील मध्यमवर्गाने आणि कनिष्ठ मध्यमवर्गाने पौष्टिक खाण्यावर होणाऱ्या खर्चाला कात्री लावली आहे. जीवनसत्त्वे असलेल्या पदार्थाच्या खरेदीचे प्रमाण १९९५ मध्ये ८२ टक्के होते, ते २०१३ मध्ये ४० टक्क्य़ांपर्यंत घटले आहे. स्निग्धांश असलेल्या पदार्थाच्या खरेदीचे प्रमाण १९९५ मध्ये ७५ टक्के होते, ते २०१३मध्ये ३५ टक्क्य़ांपर्यंत घटले आहे. कबरेदके असलेल्या पदार्थाची खरेदी १९९५मध्ये ८५ टक्के होती, ती २०१३मध्ये ३८ टक्के झाली आहे, असे निष्कर्ष असोचमच्या सर्वेक्षण अहवालातून पुढे आले आहेत.
असोचमतर्फे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये देशातील प्रमुख शहरांमध्ये ही पाहणी करण्यात आली. पौष्टिक पदार्थावरील खर्चामध्ये दिल्लीकरांनी सर्वाधिक कपात केली आहे. पौष्टिक अन्नपदार्थावरील खर्चामध्ये कपात करण्यामध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर, त्यानंतर अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, पुणे, चंदिगड या शहरांमध्ये महागाईचा परिणाम दिसत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशातील बहुतेक लोक हे शाकाहारी आहेत. त्यांचा बहुतेक भर हा दूध आणि दुग्धजन्य पदार्थावर असतो. दुग्धजन्य पदार्थाच्या वाढलेल्या किमतींमुळे ते परवडेनासे झाले आहेत. टोमॅटो, कांदे, बटाटे, भेंडी अशा तुलनेने सगळीकडे उपलब्ध असलेल्या भाज्या आणि सीझनल फळे मध्यमवर्गाला परवडेनाशी झाली आहेत, असे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामध्ये ८७ टक्के लोकांनी सीझनल फळे परवडत नसल्याचे सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 2:55 am

Web Title: decrease in sale of nutritious food due to dearth
Next Stories
1 औषध खरेदी जादा दराने होणार हे आधीच माहीत होते..
2 सरकारकडे अनुदानाची मागणी करीत बालकुमार साहित्य संमेलनाची सांगता
3 पुण्यात चिंब पावसाळी वातावरणात सरी!
Just Now!
X