29 October 2020

News Flash

तंबाखू सेवन करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण घटले

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील निष्कर्ष

(संग्रहित छायाचित्र)

भक्ती बिसुरे

पुरुषांकडून केले जाणारे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन घटल्याचा अहवाल नुकताच जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केला आहे. तंबाखू सेवनाचे प्रमाण घटल्याचे सकारात्मक निरीक्षण प्रथमच आढळल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तंबाखू वापराला प्रतिबंध करण्यासाठी विविध देशांनी स्वीकारलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे हा बदल दिसत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात नमूद केले आहे.

गेल्या दोन दशकांमध्ये जागतिक स्तरावरील तंबाखूचा वापर १.३९७ अब्जावरून १.३७७ अब्जापर्यंत आला आहे, म्हणजेच सुमारे साठ दशलक्ष व्यक्तींनी तंबाखू सेवन बंद केल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. यामध्ये महिलांची संख्या मोठी असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. सन २००० मध्ये ३४६ दशलक्ष महिला तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन किंवा वापर करीत होत्या. सन २०१८ मध्ये हे प्रमाण २४४ दशलक्ष इतके कमी झाल्याचे दिसून आले.

२००० सालामध्ये तब्बल १.०५० अब्ज पुरुष तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करीत होते, हे प्रमाण २०१८ मध्ये १.०९३ अब्ज एवढे वाढलेले पाहायला मिळाले. मात्र, नवीन अहवालात तंबाखू सेवन करणाऱ्या पुरुषांची संख्या वाढणे थांबले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.  २०२० पर्यंत २०१८ च्या तुलनेत दहा दशलक्ष पुरुष तंबाखू सेवनापासून मुक्त होतील असा अंदाजही या अहवालात वर्तवण्यात आला आहे. जगातील प्रमुख देशांनी २०२५ पर्यंत तंबाखू सेवन आणि वापरामध्ये ३० टक्के घट करण्याचे लक्ष निश्चित केले आहे. त्या दृष्टीने ३२ देश मार्गक्रमण करीत असल्याचे देखील जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

दरवर्षी, आठ दशलक्षांहून अधिक व्यक्ती तंबाखूच्या सेवनाने मृत्यू पावतात. त्यापैकी सुमारे सात दशलक्ष व्यक्ती तंबाखूचे थेट सेवन करतात. सुमारे एक दशलक्ष व्यक्ती धूम्रपान करतात. तंबाखूशी संबंधित आजारांमुळे होणारे सर्वाधिक मृत्यू कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये होतात. तंबाखू वापर आणि सेवन करण्यात पुरुषांचे प्रमाण प्रचंड आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या तंबाखू नियंत्रण विभागाचे डॉ. विनायक प्रसाद यांनी सांगितले.

नव्या अहवालातील निरीक्षणे सकारात्मक असून धोरणात्मक निर्णय आणि कायद्यांचा प्रभावी वापर कायम ठेवण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेतर्फे करण्यात आले आहे. सन २०१९ च्या अहवालात पाहायला मिळणारी तंबाखू वापरातील घट हे एक सकारात्मक पाऊल असून त्याचा उपयोग तंबाखूचा वापर ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी करणे शक्य आहे.

– डॉ. विनायक प्रसाद, तंबाखू नियंत्रण विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2019 1:36 am

Web Title: decrease in tobacco consumption abn 97
Next Stories
1 ‘अक्षरधारा’ मासिकाचा वर्षभरातच विश्राम
2 विदर्भात थंडीची लाट
3 VIDEO: पुण्याच्या विजय जोशींचं ‘मिग-२७’ बरोबर आहे हे अनोखं नातं
Just Now!
X