13 August 2020

News Flash

सांस्कृतिक केंद्रांच्या उत्पन्नात सव्वा कोटींची घट

करोना संकटाचा महापालिकेला फटका

करोना संकटाचा महापालिकेला फटका

पुणे : करोना संकटाचा महापालिकेला फटका बसला असून शहरातील सांस्कृतिक केंद्रांच्या उत्पन्नामध्ये सव्वा कोटी रुपयांची घट झाली आहे. मार्चअखेपर्यंत सहा कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, करोना संकटामुळे त्यामध्ये सव्वा कोटी रुपयांनी ते घटले.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशातून राज्य शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी आणली होती. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, अण्णा भाऊ साठे नाटय़गृह आणि गणेश कला क्रीडा मंच यांसह महापालिकेची १४ सांस्कृतिक केंद्रे बंद आहेत. आरक्षित झालेले कार्यक्रम ऐनवळी रद्द करावे लागल्यामुळे महापालिकेचे जवळपास सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आपल्याकडे कार्यक्रमाच्या काही दिवस आधी नाटय़गृहाच्या आरक्षणापोटी रक्कम संयोजक जमा करतात. त्यामुळे सव्वा कोटी ही रक्कम कमी दिसते, अशी माहिती महापालिका रंगमंदिर मुख्य व्यवस्थापक सुनील मते यांनी दिली. जगभर करोनाचे सावट असले, तरी पुण्यामध्ये १५ मार्चपासून त्याचे पडसाद उमटू लागले होते. तीन दिवसांचा व्यापाऱ्यांचा बंद, जनता संचारबंदीचे पंतप्रधानांनी केलेले आवाहन आणि त्यानंतर लगेचच राज्य शासनाने लागू केलेली टाळेबंदी यांमुळे नाटय़गृहे बंदच ठेवण्यात आली आहेत. दरवर्षी मे ते ऑगस्ट या कालावधीत नाटय़गृहांच्या तारखांचे आरक्षण करण्यासाठी चौमाही वाटप केले जाते. यंदा करोना संकटामुळे चौमाही वाटप होऊ शकले नाही, असेही मते यांनी सांगितले.

नंतरच्या तारखांना प्राधान्य

नाटय़गृह केव्हा सुरू होतील याची शाश्वती नाही. त्यामुळे नाटय़गृहांच्या आरक्षणातून मिळालेली रक्कम ही मागणी झाल्यास कार्यक्रमाच्या संयोजकांना परतावा म्हणून द्यावी लागणार आहे. मात्र, बहुतांश जणांनी परतावा घेण्यापेक्षा नाटय़गृह सुरू झाल्यावर नंतरच्या तारखा मिळाव्यात यासाठी प्राधान्य दिले आहे, असे सुनील मते यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 12:54 am

Web Title: decrease income over one crore of cultural centers in pune zws 70
Next Stories
1 सांगलीचे विजय लाड राज्यात प्रथम
2 दोन दिवस राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज
3 मेट्रोच्या नावाखाली विकासकाला भूखंड?
Just Now!
X