अपात्र ठरलेल्या देशातील ४४ अभिमत विद्यापीठांचे भवितव्य येत्या आठवडय़ात ठरणार आहे. ‘क’ दर्जा मिळालेल्या अभिमत विद्यापीठांबाबत निर्णय घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची विशेष बैठक मंगळवारी होणार आहे.
देशातील अभिमत विद्यापीठांची पाहणी करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने टंडन समितीची नियुक्ती केली होती. या समितीने देशातील ४४ विद्यापीठांना ‘क’ श्रेणी दिली होती. ‘क’ श्रेणीतील विद्यापीठे ही आवश्यक ते निकष पूर्ण करत नसल्यामुळे त्यांची मान्यता काढून घेण्याचीही शिफारस केली होती. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगानेही या समितीच्या अहवालाला अनुषंगून अभिमत विद्यापीठांची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमली होती. मात्र, तरीही या विद्यापीठांबाबत अंतिम निर्णय झाला नाही. या प्रकरणी एकूण तीन विविध समित्यांनी आपले अहवाल शासनाला सादर केले आहेत.
या विद्यापीठांची मान्यता रद्द करण्याबाबत एका जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात आयोगाला तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. ‘टंडन’ समितीने दिलेल्या अहवालाकडे आयोग दुर्लक्ष करू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या पाश्र्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सदस्यांची विशेष सभा ११ आणि १२ मार्चला होणार आहे. या सभेमध्ये नेमण्यात आलेल्या तिन्ही समित्यांचे अहवाल, निकषांच्या पूर्ततेबाबत विद्यापीठांनी दिलेली उत्तरे, विद्यापीठांच्या पाहणी समित्यांचे अहवाल अशा सर्वाची चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये ‘क’ दर्जाच्या अभिमत विद्यापीठांचे भवितव्य ठरणार आहे.