ज्येष्ठ नाटय़दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांची पत्नी दीपाली यांच्या खून प्रकरणात शुश्रूषेसाठी ठेवण्यात आलेल्या मदतनिसाला पोलिसांकडून अटक करण्यात आली. दीपाली यांनी चहा न दिल्याने रागाच्या भरात त्यांचा खून केल्याची कबुली आरोपीने प्राथमिक तपासात पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी किसन अंकुश मुंडे (वय १९,रा. भूम, उस्मानाबाद) याला अटक करण्यात आली आहे.

कोल्हटकर यांच्या शुश्रूषेसाठी दोन मदतनीस ठेवण्यात आले होते. त्यापैकी एक मुंडे होता. दीपाली यांचा खून झाल्यानंतर मुंडे लगेचच घरातून निघून गेला होता. त्यामुळे पोलिसांचा त्याचावरचा संशय बळावला होता. त्याला रविवारी न्यायालयाने त्याला १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आरोपी किसन मुंडे कामावर आल्यानंतर दीपाली यांच्याकडे सतत खायला मागायचा. बुधवारी (७ फेब्रुवारी) सायंकाळी त्याने दीपाली यांच्याकडे चहा मागितला. त्या वेळी दीपाली यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे त्याने रागाच्या भरात त्यांचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. मुंडे दररोज सकाळी आठ ते रात्री आठ  यावेळेत कोल्हटकर यांच्याकडे काम करायचा. दीपाली यांचा खून केल्यानंतर तो कामावरून अर्धा तास लवकर निघाला होता.