पालिकेचे कानावर हात, महापौरांकडून कारवाईचे आदेश

पिंपरी : निगडी स्मशानभूमीत करोनाबाधितांच्या मृतदेहांची विटंबना होत असल्याची तक्रार आल्यानंतर पिंपरी पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर माई ढोरे यांनी स्थानिक नगरसेवक व अधिकाऱ्यांसह स्मशानभूमीची पाहणी केली असून योग्य कारवाईचे आदेश दिले आहेत.

रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधी करण्याची सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिली आहे. २ जूनला अंत्यविधी झालेल्या एका करोनाबाधिताचा मृतदेह अर्धवट जळाला होता. तसेच, त्या ठिकाणी श्वान घुटमळत होते, अशा आशयाची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी महापौर माई ढोरे तसेच आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.  तक्रारीची दखल घेत महापौरांनी निगडी स्मशानभूमीत जाऊन पाहणी केली. सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,  नगरसेवक सचिन चिखले, सुमन पवळे, उत्तम केंदळे, कमल घोलप आदी उपस्थित होते.   प्रकाराबाबतची सविस्तर माहिती महापौरांनी घेतली. येथे अंत्यसंस्कार होत असताना सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांनी जबाबदारी काम केले पाहिजे, असे बजावतानाच यापुढे खबरदारी घेण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.

या प्रकाराची सखोल चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल. त्या दृष्टीने ठेकेदाराला नोटिस बजावण्यात आली असून खुलासा मागवण्यात आला आहे. मृतदेह अर्धवट जळालेला नाही, तसेच श्वानांकडून मृतदेहाची विटंबना झालेली नाही, असे संबंधित मयताच्या कुटुंबीयांनी पालिकेला लेखी दिले आहे.

– डॉ. अनिल रॉय, मुख्य आरोग्य अधिकारी, पिंपरी पालिका

निगडी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी गेलो असता, तेथे एक मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. श्वानांकडून त्या मृतदेहाची विटंबना झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी महापालिकेकडे तक्रार केली आहे. या घटनेत संबंधित ठेकेदार आणि आरोग्य अधिकारी दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

– दीपक खैरनार, तक्रारदार, निगडी.