अवघ्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले देहू येथील संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि आळंदी मधील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर सोमवार सकाळ पासून भाविकांसाठी अटी आणि शर्थींसह खुली करण्यात आली आहेत. सकाळ पासूनच दोन्ही मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली असून करोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन केले जात आहे. मंदीर प्रशासन विशेष काळजी घेत असून काही अंतराने मंदिरात स्वछता केली जात आहे. प्रदीर्घ काळानंतर आपल्या लाडक्या माऊली आणि तुकोबा रायांना भेटण्यासाठी भाविकांनी मंदीरात गर्दी केली होती.

अवश्य पाहा – बाप्पा पावला ! दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी…

कोविड महामारीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून अवघ्या महाराष्ट्रातील मंदीरं बंद आहेत. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात ओसरल्याने मंदीरं सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. तसेच विरोधकांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन करत मंदीर न उघडल्याने निषेध व्यक्त केला होता. यानंतर ऐन पाडव्याचा मुहूर्त साधून महाराष्ट्रातील मंदीरं ठाकरे सरकारने भाविकांसाठी खुली केली आहेत.

देहू येथील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे मंदिर आज सकाळी नऊ च्या सुमारास भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मास्कचे वाटप मंदीर प्रशासनाकडून करण्यात आले. तसेच भाविकांना मंदिरात जाण्याअगोदर हात स्वच्छ सॅनिटायझ करूनच आत प्रवेश दिला जात आहे. तर, आळंदीमध्ये देखील संत ज्ञानोबांच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या असून करोना संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याचं पहायला मिळालं. प्रत्येक भाविकांनी मास्क परिधान केले आहे का नाही याची तपासणी मंदीर प्रशासन वारंवार करत आहेत. याचसोबत दर्शन घेत असताना सोशल डिस्टसिंगच्या नियमाचं पालन केलं जाईल याची विशेष काळजी घेतली जात आहे. तब्बल आठ महिन्यांनी भाविकांनी ज्ञानोबा आणि तुकोबांचे दर्शन घेतले असून वारकरी आणि भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.