News Flash

Video : देहूच्या वेशीवर वारकऱ्यांचा ‘भजन सत्याग्रह’; विठ्ठल नामाच्या गजरात आंदोलन

देहूगावच्या वेशीवर दोनशेच्या जवळपास वारकरी भजन करत आंदोलनात सहभागी

बंडातात्या कराडकर यांनी ‘भजन सत्याग्रह’चा पवित्रा घेतला असून देहूगावच्या वेशीवर दोनशेच्या जवळपास वारकरी भजन करत आंदोलन करत आहेत. बीज सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांनी देहूत यावं असं आवाहन बंडातात्यांनी नुकतंच केलं होतं. त्यानुसार आज देहूच्या वेशीवर महाराष्ट्राच्या काही भागातून वारकरी आले आहेत. भजन करत शांततेच्या मार्गाने ते आंदोलनाद्वारे आपले म्हणणे मांडत आहेत. आंदोलनादरम्यान दुपारी पाच वाजेपर्यंत तरी बंडातात्यांनी आपली पुढील भूमिका देहूच्या वेशीवरुन वारकऱ्यांना संबोधित करताना मांडलेली नाही. या आंदोलनात वारकाऱ्यांकडून कोरोना संदर्भातील सोशल डिस्टसिंग आणि मास्क वापरण्याच्या नियमांचे पालन केलं जात असल्याचं पाहायला मिळालं आहे. पोलिसांना निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप होणार असल्याचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितलं आहे. दुपारी तीन वाजल्यापासून ऐन उन्हात बसून वारकरी भजन सत्याग्रह करतानाचे चित्र दिसलं.

नक्की पाहा >> Photos: टाळ, मृदुंग, मास्क अन् सोशल डिस्टन्सिंग… देहूच्या वेशीवर पोलिसांसमोर ‘भजन सत्याग्रह’

नक्की वाचा >> देहू बीज सोहळा : वारकरी समाजाची मुस्कटदाबी अशापद्धतीने किती दिवस करणार आहात?; बंडातात्यांचा सवाल

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी या निर्णयाविरोधात देहूच्या वेशीवर आंदोलनाची हाक दिली. “यंदा देहू येथील तुकाराम बीज कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरी करणारच, यासाठी आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरी या गुन्ह्यांना सामोरे जायची आमची तयारी आहे,” असं बंडातात्या कराडकर यांनी दीड आठवड्यापूर्वी सातारा येथे म्हटलं होतं. हीच भूमिका कायम असल्याचं आज बंडातात्यांनी स्पष्ट केलं आहे. “आमच्या भूमिकेशी आम्ही ठाम आहे. देहूकरांनी कोणती भूमिका घ्यावी त्याचं स्वातंत्र्य देहूकरांना आहे. हा वैयक्तिक निर्णय आहे असं जेव्हा देहूकर म्हणतात तेव्हा या निर्णयाला महाराष्ट्राने पाठिंबा दिला. आता नागपूर, वर्धा येथून सुद्धा वरकरी भावी उन्हातान्हामध्ये उभे आङेत वैयक्तिक निर्णयाला एवढा प्रतिसाद कसा देतो. हा वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषय असल्याने हा वैयक्तिक निर्णय आहे, असं विधान देहूकर कसं काय करु शकतात?,” असा प्रश्न बंडातात्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होण्यापूर्वी उपस्थित केला.

व्यवस्थापन देहूच्या आत असून आम्ही देहूच्या वेशीवर आंदोलन करणार आहे असंही बंडातात्यांनी स्पष्ट केलं आहे. “व्यवस्थापन देहूच्या आत असून आम्ही देहूच्या बाहेर आहोत. व्यवस्थानची संकल्पना अशी आहे शासन निर्णयाला बाधा येऊ नये म्हणून नियंत्रित लोकांच्या उपस्थितीत करु. आमचं म्हणणं असं आहे की देहूसाठी येणारा जो सामान्य वारकरी समाज आहे तो वारकरी समाज कोणत्यातरी श्रद्धेने येतो आहे. आपण या वारकरी समाजाची मुस्कटदाबी अशापद्धतीने किती दिवस करणार आहात?, पंढरपूरला यायचं नाही, गावातून दिंडी काढून चालायचं नाही. माझा देहूकरांना एक सामान्य प्रश्न आहे. मागील वर्षी या उत्सव काळामध्ये या रोगाचं भयानक स्वरुप होतं. गेल्या वर्षी कार्तिक वारीपर्यंत सरकारनं मंदिरही खुलं केलं नव्हतं. अशा काळामध्ये सरकारचा आदेश मोडून माणिक महाराजांनी देहू ते पंढरपूरवारी कोणत्या आधारावर केली होती?, तेव्हा त्यांना आपण शासनाचा आदेश मोडतोय असं माणिक महाराजांना वाटलं नाही का?,” असा प्रश्न बंडातात्यांनी विचारला आहे. टाळ वाजवत, भजनं म्हणत, दोन माणसांमध्ये तीन फुटांचं अंतर ठेवत, मास्क घालून, शांतेतनं कोणत्याही चेतावणीच्या घोषणा दिल्या जाणार नाही. पोलीस आमच्या समाजाला जिथे आवडतील तिथे आहे त्या ठिकाणी बसण्याची आमची तयारी आहे, असंही बंडातात्यांनी हे आंदोलन सुरु करण्याच्या आधीच स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 5:15 pm

Web Title: dehu beej sohala bhajan satyagraha on boundary of dehu by banda tatya karadkar and his supporters kjp 91 scsg 91
Next Stories
1 पुण्यात सेंट्रल मॉलमध्ये गॅस गळती; मॉलमधून ३०० जणांना बाहेर काढण्यात आलं
2 ‘त्या’ भेटीत नेमकं काय झालं? चंद्रकांत पाटील म्हणतात….
3 पुणे हादरलं! तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन छातीत झाडली गोळी, मात्र मोबाईलमुळे बचावली
Just Now!
X