धरणात अद्यापही पाणीसाठा; रिकामे करण्याची प्रक्रिया लवकरच

पुणे : गळती असलेले टेमघर धरण डिसेंबर महिन्यात रिकामे करण्यात येणार होते. मात्र, यंदा लांबलेला पाऊस आणि पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाण्याची मागणी झाल्याने या धरणात अद्यापही पाणीसाठा शिल्लक ठेवण्यात आला आहे. हे धरण लवकरच पूर्णपणे रिकामे करण्यात येणार असून अल्पमुदतीची कामे येत्या पावसाळ्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जलसंपदा विभागाने ठेवले आहे.

टेमघर धरणातून होणारी गळती रोखण्याचे काम २०१७ पासून सुरू आहे. केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्थेच्या (सीडब्ल्यूपीआरएस) या संस्थेने केलेल्या शिफारशीनुसार आणि राज्य सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ गटाच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात येत आहे. पाऊस थांबल्यानंतर दुरुस्तीच्या कामासाठी धरण रिकामे करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार अल्पमुदतीची कामेही सुरू करण्यात आली आहेत. सध्या या धरणात ०.०८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच २.१७ टक्के एवढा पाणीसाठा आहे. पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची मागणी झाल्याने हे धरण तातडीने रिकामे करण्यात आलेले नाही. मात्र, या पाणीसाठय़ामुळे धरण दुरुस्तीच्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा आलेला नसून ही कामे सुरूच आहेत.

दरम्यान, यंदा टेमघर धरणाच्या क्षमतेपेक्षा (३.७१ टीएमसी) या परिसरात जास्त पाऊस झाल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी सोडून द्यावे लागले. त्यामुळे अतिरिक्त पाणीसाठा करता येईल किंवा कसे, याबाबत उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी विचारणा केली आहे. धरणसुरक्षा करताना मुळशी, कोयना आणि उजनी येथे अतिरिक्त पाणीसाठा तयार करण्यात आला होता. त्यानुसार टेमघर धरणाबाबतही करता येऊ शकेल का, याबाबत जलसंपदा विभागाकडून अभ्यास करण्यात येत आहे. मात्र, धरणाची उंची वाढवण्यासाठी धरणाच्या सुरक्षेसाठी दीर्घकालीन कामे करावी लागणार आहेत. ही कामे झाल्यानंतरच हे धरण पूर्ण क्षमतेने भरता येणे शक्य आहे. याबाबत तज्ज्ञ समितीने कळवले आहे. तसेच धरणाची दीर्घकालीन कामे करण्यासाठी आवश्यक निधी, परवानगी राज्य सरकारकडून मिळणे आवश्यक आहे.

’ टेमघर ०.०८ टीएमसी (२.१७) ’ वरसगाव १०.५२ टीएमसी (८२.०५) ’ पानशेत ९.४६ (८८.८२) ’ खडकवासला १.५८ (७९.८६) चारही धरणांमध्ये मिळून एकूण २१.६४ म्हणजेच ७४.२१ टक्के एवढा पाणीसाठा सध्या शिल्लक आहे.

(शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा टीएमसी कंसात टक्क्य़ांमध्ये)