पुणे महापालिकेकडून दिरंगाई

पुणे : एका बाजूला अधिकाधिक करोना रुग्णांचे लवकरात लवकर निदान करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्याची गरज असताना पुणे महापालिके च्या चाचणी केंद्रांकडून मात्र या बाबतीत दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांना चाचणी करून घेण्यासाठी के ंद्रांबाहेर रांगेत ताटकळावे लागत आहे. एवढे करून तासभर रांगेत थांबलेल्या रुग्णांना चाचणी संच संपल्याचे सांगितले जात असल्यामुळे त्यांना पुढील चाचणी के ंद्राचा शोध घ्यावा लागत आहे.

बुधवारी करोना चाचण्यांबाबत के ंद्राची असलेली अनास्था काही रुग्णांना अनुभवावी लागली. संतोष पाटील (नाव बदलले आहे) यांनी आपला अनुभव ‘लोकसत्ता’ला सांगितला. पाटील म्हणाले, बुधवारी दिवसभर किमान तीन ते चार ठिकाणी करोना चाचणीसाठी जाऊन ताटकळत राहण्याचा अनुभव घेतला. करोनासदृश लक्षणे दिसत असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्यानुसार चाचणीसाठी गेलो. एसएनडीटी येथील चाचणी के ंद्रावर तब्बल एक तास रांगेत उभे राहून माझी चाचणी होण्याची वाट पाहिली. प्रत्यक्षात माझा क्रमांक आला त्यावेळी चाचणी संच संपले असल्यामुळे आज चाचणी होऊ शकत नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे इतर ठिकाणी जाऊन पुन्हा रांगेत थांबावे लागले. करोनासदृश लक्षणे असताना रुग्णांची अशी परवड करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न पडला.

दरम्यान चाचणी संच संपल्यामुळे चाचणी होऊ शकत नाही हे कारण अजिबात स्वीकारले जाणार नसल्याचे महापालिके तील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, महापालिके च्या आरोग्य विभागाकडे किमान ४० हजार चाचणी संच आहेत. त्यामुळे संच उपलब्ध नाही म्हणून चाचणी होऊ शकत नाही हे कारण दिले जात असेल तर ते योग्य नाही. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नियमांप्रमाणे करोना चाचण्यांमधील स्वॅब चाचणी आणि अँटिजेन चाचणी यांच्या प्रमाणात काही बदल करण्यात आले आहेत, मात्र संच आणि इतर सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत याबद्दल नागरिकांनी खात्री बाळगावी, असेही डॉ. वावरे यांनी स्पष्ट के ले.