01 December 2020

News Flash

दिवाळी फराळाच्या घरगुती पदार्थाना मागणी

करोनामुळे फराळ बनविणाऱ्यांच्या संख्येमध्ये पाचपट वाढ

करोनामुळे फराळ बनविणाऱ्यांच्या संख्येमध्ये पाचपट वाढ

पुणे : घरगुती चव, कमी तेलाचा वापर करून केलेले पदार्थ आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला मिळालेले प्राधान्य या निकषांवर घरगुती उद्योग करणाऱ्या महिलांकडून बनविलेल्या फराळाच्या पदार्थाना मागणी वाढत आहे. करोना संकटामध्ये नोकरी गमवावी लागल्यानंतर फराळाचे पदार्थ तयार करण्याच्या उद्योगामध्ये पदार्पण करणाऱ्यांच्या संख्येमध्ये पाचपट वाढ झाली आहे. महागाईचा चटका बसल्यामुळे फराळाच्या पदार्थाच्या दरामध्ये दहा टक्क्य़ांची वाढ करण्यात आली आहे.

चिवडा, चकली, रवा आणि बेसन लाडू, शंकरपाळ्या, शेव, करंजी आणि अनारसे अशा पदार्थाची जिभेवर रेंगाळणारी चव हे दिवाळीचे वैशिष्टय़ असते. नोकरीचा व्याप सांभाळून फराळाचे पदार्थ करण्यास वेळ मिळू न शकणाऱ्या महिलांना फराळाचे पदार्थ आयते घेण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये घरगुती स्तरावर फराळाचे पदार्थ करून त्याची विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून अनेक गृहिणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. परदेशातील नातलगांना फराळ पाठविण्यासाठी गृहिणींनी केलेल्या स्वादिष्ट पदार्थाना पसंती दिली जात आहे. करोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून स्तब्ध झालेल्या बाजारपेठेमध्ये आता दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे.

गेल्या वर्षीपर्यंत घरगुती फराळाच्या पदार्थाची विक्री करणाऱ्यांची संख्या ८०० ते एक हजारच्या घरामध्ये होती. सध्या ही संख्या साडेपाच हजारांहून अधिक झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी दिली. सोसायटय़ांमधील महिला एकत्र येऊन फराळाचे पदार्थ करतात. स्वच्छतेची खबरदारी घेत घरगुती केलेल्या पदार्थामुळे नागरिकांना त्यांच्या भागात घरगुती चव असलेले फराळाचे पदार्थ मिळत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नव्याने आलेल्या व्यावसायिकांचा परिणाम सध्या या क्षेत्रात कार्यरत असलेले व्यावसायिक आणि फराळाच्या पदार्थाची विक्री करणाऱ्या मिठाई व्यावसायिकांवर झाला आहे, असे सरपोतदार यांनी सांगितले.

फराळाचे पदार्थ बनविणे सोपे

चकलीचा खेळ भाजणीवर असतो. तर, साजूक तुपामध्ये डाळीचे पीठ भाजण्यावर बेसन लाडू उत्तम होतात. मात्र, भाजणी आणि अनारसे यांचे तयार पीठ मिळत असल्याने पदार्थ करणे तुलनेने सोपे झाले आहे. करोनामुळे सध्या घरामध्ये असलेल्या पुरुष मंडळींकडूनही फराळाचे पदार्थ करण्यासाठी मदत होत असल्याने अर्थार्जनासाठी या व्यवसायातील संख्या वाढत आहे. विकत घेणारे मर्यादित आणि फराळाचे पदार्थ करणाऱ्यांची वाढती संख्या असे सध्याचे चित्र आहे, असे पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार यांनी सांगितले.

ग्राहकांकडून मागणी आल्यानंतर फराळाचे पदार्थ करून दिले जातात. चव, स्वच्छता आणि कमी तेलाच्या वापरामुळे घरगुती दिवाळी पदार्थाना अधिक मागणी असते. दिवाळीला अवकाश असला तरी काही कुटुंबांमध्ये परदेशातील नातलगांना फराळ पाठविण्यासाठीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नसल्याने यंदा ऑर्डर तुलनेने कमी आल्या आहेत. महागाईची झळ फराळाच्या पदार्थाना बसली असून प्रत्येक पदार्थामागे काही प्रमाणात दरवाढ झाली आहे. पदार्थाच्या गुणवत्तेनुसार दर आकारला जातो.

अंजली फणसळकर, गृहिणी आणि लघु व्यावसायिक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 12:45 am

Web Title: demand for homemade diwali faral increased zws 70
Next Stories
1 पुण्यात दिवसभरात १३३ नवे रुग्ण, पिंपरीत १२१ रुग्ण
2 पिंपरी-चिंचवडमध्ये साडेआठ लाख नागरिकांना होऊन गेला करोना
3 …तर राजकारण सोडून हिमालयात जाईन-चंद्रकांत पाटील
Just Now!
X