किरकोळ बाजारातील दर प्रतिकिलो ४० ते ५० रुपय

पुणे : पावसात गरमागरम भुईमूग शेंगा खाण्याची मजा काही औरच! भुईमूग शेंगांचा हंगाम सुरू झाला असून पावसाळी वातावरणात शेंगांना मागणीही चांगली आहे.  किरकोळ बाजारात प्रतिकिलो ४० ते ५० रुपये या दराने भुईमूग शेंगांची विक्री केली जात आहे.

पावसाळ्याची चाहूल लागल्यानंतर भुईमूग शेंगांचा हंगाम सुरू होतो. पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक भागातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर भुईमूग शेंगांची लागवड करतात. पावसाळ्यात पर्यटनस्थळांवरून भुईमूग शेंगांच्या मागणीत वाढ होते. यंदाच्या वर्षी र्निबधांमुळे पर्यटनस्थळावरून असलेली मागणी काहीशी कमी झाली असली,तरी किरकोळ बाजारात भुईमूग शेंगांना चांगली मागणी आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात शेंगांची आवक सुरू होते. सप्टेंबर महिन्यापर्यंत हंगाम सुरू राहतो. मार्केटयार्डातील घाऊक बाजारात पुणे विभागातून दररोज १५० ते २०० गोणी भुईमूग शेंगांची आवक होत आहे. घाऊक बाजारात दहा किलो शेंगांना प्रतवारीनुसार २५० ते ३०० रुपये दहा किलो असा दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये दराने शेंगांची विक्री केली जात आहे. भुईमूग शेंगामध्ये दोन प्रकार असतात. लाल दाण्याच्या शेंगांचा वापर शेंगदाणा तेलासाठी केला जातो. पांढऱ्या दाण्याच्या शेंगांचा वापर खाण्यासाठी केला जातो, असे भुजबळ यांनी सांगितले.