मोफत हवा, पाणी व स्वच्छतागृह या सुविधा पेट्रोल पंपावर देणे गरजेचे असताना अनेक पंपांवर या सुविधा दिल्या जात नाहीत. अशा पेट्रोल पंपांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर शिंदे, शहर कार्याध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. नियमानुसार पेट्रोल पंपधारकांना ग्राहकांसाठी काही सुविधा द्याव्या लागतात. या सुविधा देणे त्यांना बंधनकारक आहे. वाहनांसाठी मोफत हवा, त्याचप्रमाणे पाणी व स्वच्छतागृह प्रत्येक पेट्रोल पंपावर या सुविधा देणे आवश्यक आहेत. ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये या सुविधा अनेक पंपांवर पुरविल्या जात नसल्याचे दिसून आले.
ग्राहकांना सुविधा न देता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंपधारकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत. अन्यथा, या प्रश्नावर संस्थेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.