News Flash

महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष आयोग स्थापन करा

पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल जागरुकता निर्माण करण्याबरोबरच असोसिएशनचे कार्यकर्ते मानसिकदृष्टय़ा खचलेल्या पुरुषांना आधार देण्यामध्ये साहाय्य करीत आहेत.

महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष आयोग स्थापन करा, अशी मागणी पुरुष हक्कासाठी काम करणाऱ्या पुण्यातील ‘मेन्स राइटस् असोसिएशन’ या  स्वयंसेवी संस्थेने केली आहे. समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी समान कायदे असावेत ही अपेक्षा असून त्याच भूमिकेतून पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
१९ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस म्हणून साजरा केला जातो. १९९९ मध्ये ही संकल्पना अस्तित्वात आली असून जगभरातील ६० देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. मेन्स राइट्स असोसिएशन गेल्या चार वर्षांपासून पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करीत आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष महेश शिंदे यांनी दिली. आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसाचे औचित्य साधून गुरुवारी (१९ सप्टेंबर) संभाजी उद्यान येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळात रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी आणि वाहन प्रदूषण नियंत्रण तपासणी असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी समान कायदे असावेत यासाठी मानसिकता विकसित करण्याच्या उद्देशातून असोसिएशनतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. कौटुंबिक हिंसाचार कायदा, ४९८- अ, कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार या कायद्यांमुळे महिलांना संरक्षण मिळाले असले तरी या कायद्यांचा दुरुपयोग होत असल्याने अनेक पुरुषांना त्याचा जाच होत आहे हे वास्तव नाकारता येत नाही. यामुळे अनेक युवकांचे संसार मोडले असून त्यांना आपल्या मुलांना भेटण्याची चोरी झाली आहे. अशा जाचाला कंटाळून पुरुषांनी आत्महत्या केल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत, याकडेही महेश शिंदे यांनी लक्ष वेधले आहे. पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल जागरुकता निर्माण करण्याबरोबरच असोसिएशनचे कार्यकर्ते मानसिकदृष्टय़ा खचलेल्या पुरुषांना आधार देण्यामध्ये साहाय्य करीत आहेत. अशा पुरुषांना मानसिक आधार देण्याच्या उद्देशातून महिला आयोगाच्या धर्तीवर राज्य सरकारने पुरुष आयोगाची स्थापना केली पाहिजे. विविध प्रकारच्या लिंगभेद कायद्यामुळे त्रस्त झालेल्या पुरुषांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोफत कायदेशीर मार्गदर्शन करण्याच्या उद्देशातून आम्ही दर रविवारी संभाजी उद्यानामध्ये दुपारी चार वाजता एकत्र जमतो, असेही शिंदे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 3:17 am

Web Title: demand of men commission
Next Stories
1 अवघ्या १५ सेकंदात ईसीजी काढणारे उपकरण
2 आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सवासाठी ‘आषाढातील एक दिवस’ची निवड
3 सक्षम सेवेचा आराखडा करण्यात पीएमपीकडून दिरंगाई
Just Now!
X