उधळपट्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी

पुणे : फिरत्या विसर्जन हौदांसाठी महापालिके ने सव्वा कोटींचा खर्च करून भाडेकराराने साठ मिनी ट्रक आणि फिरते हौद अकरा दिवसांसाठी घेतले आहेत. त्यासाठी प्रतिदिन साडेअकरा लाख रुपयांचा खर्च महापालिका करत असून विसर्जन दुसऱ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या अशा चार दिवशी होत असताना अकरा दिवसांसाठी ही उधळपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या कराच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.

महापालिके ने गेल्या वर्षी ३० फिरते हौद भाडेकराराने घेतले होते. असे असताना यंदा दुप्पट म्हणजे ६० फिरते हौद घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे उत्सवातील अकरा दिवसांसाठी भाडेकराराने हौद घेण्यात आले असल्याची बाब सजग नागरिक मंचने उघडकीस आणली आहे. मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी त्याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे.

गणेशोत्सव दहा दिवसांचा असताना अकरा दिवसांचे भाडे ठेके दाराला दिले जाणार आहे. यंदा मिरवणुकांना परवानगी नाही. त्यामुळे विसर्जन अनंत चतुर्दशीलाच म्हणजे दहाव्या दिवशी पूर्ण होणार आहे. पहिल्या दिवशी कोणत्याच गणपतीचे विसर्जन होत नाही. त्यामुळे त्या दिवसाचे पैसेही वाया जाणार आहेत. पहिल्या आणि अकराव्या दिवसाचे मिळून तेवीस लाख रुपये ठेके दाराला नाहक दिले जाणार आहेत, असे वेलणकर यांनी सांगितले.

ते म्हणाले की, गेल्या वर्षी संचारबंदीच्या नियमांमुळे फिरत्या हौदांची संकल्पना योग्य होती. जास्तीत जास्त गणपतींचे विसर्जन दुसऱ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी होत असते. उर्वरित सात दिवस दहा-बारा फिरते हौद पुरेसे झाले असते.

मात्र सर्व दिवस साठ हौदांचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा विनाकारण भुर्दंड सोसावा लागत आहे. मिनी ट्रक, त्यावरील हौद आणि चालकांसह चार माणसांसाठी प्रतिदिन १९ हजार १२१ रुपये भाडे खर्च करण्यात येणार आहे. यंदा नगरसेवकांनीही प्रभागांमध्ये स्वत:चे हौद उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे महापालिके च्या फिरत्या हौदांचा किती उपयोग होणार हाही प्रश्नच आहे.

ठेकेदाराचे आर्थिक हित जोपासणाऱ्या आणि विर्सजनाच्या निविदेमध्येही घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी वेलणकर यांनी केली.