महापौर दत्ता धनकवडे यांच्यासह सर्वपक्षीय प्रतिनिधींनी रविवारी पुण्यातील हेल्मेटसक्तीला जोरदार निषेध दर्शविला. ‘हेल्मेटसक्ती विरोधी कृती समिती’तर्फे मंडईतील टिळक पुतळा येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हेल्मेटसक्ती रद्द करण्याची मागणीही केली.
‘पोलिसांनी आधी हेल्मेट घालण्याविषयी समाजप्रबोधन करायला हवे. ते न करता अचानक हेल्मेटसक्ती करणे चुकीचे आहे,’ असे मत महापौरांनी व्यक्त केले. या वेळी मेधा कुलकर्णी यांनी दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांच्याकडे हेल्मेटसक्ती रद्द करण्याची मागणी नोंदविली. समितीच्या सदस्यांनी हेल्मेटसक्ती विरुद्ध घोषणाही दिल्या.
उपमहापौर आबा बागूल, कृती समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, अंकुश काकडे, शांतिलाल सुरतवाला, समितीचे उपाध्यक्ष धनंजय जाधव, कार्याध्यक्ष इक्बाल शेख, सरचिटणीस सुरेश जैन, संदीप खर्डेकर, पुष्कर तुळजापूरकर, नितीन गुजराथी, डॉ. शैलेश गुजर, भोला वांजळे, बाळासाहेब रुणवाल, मंदार जोशी, मिहिर थत्ते, शिवा मंत्री, चंदन सुरतवाला, शिरीष बोधनी, प्रकाश बाफना, आबा धाडवे- पाटील आदी या वेळी उपस्थित होते.