अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या धर्तीवर राज्य सरकारने अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनास दरवर्षी दहा लाख रुपयांचे कायमस्वरूपी अनुदान द्यावे, अशी मागणी करणारा ठराव संमत करीत बालकुमार साहित्य संमेलनाची सोमवारी सांगता झाली.
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था आणि संवाद, पुणे यांच्यातर्फे आयोजित बालकुमार साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात बालसाहित्याच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल नागपूर येथील ज्ञानेश प्रकाशनचे डॉ. भालचंद्र काळे, ‘टॉनिक’कार कृ. ल. मानकर, सानेगुरुजी कथामालेचे चंद्रकांत इंदुरे, चित्रकार रमेश भारताल यांच्यासह तळेगाव येथील ‘कलापिनी’ संस्थेचा गौरव करण्यात आला. संस्थेचे प्रभाकर तुंगार यांनी हा सत्कार स्वीकारला. संमेलनाध्यक्ष राजीव तांबे, साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या डॉ. मंदा खांडगे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. न. म. जोशी, अनिल कुलकर्णी, नवीन इंदलकर आणि ‘संवाद’चे सुनील महाजन या वेळी उपस्थित होते.
राजीव तांबे म्हणाले, बालक, पालक आणि शिक्षक या तीनही घटकांना या संमेलनाने एकत्र आणले. अपंग, दृष्टिहीन, मूक-बधिर या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न समजावून घेत ग्रामीण भागामध्ये वर्षभर काम करण्याचा मानस आहे.
डॉ. न. म. जोशी म्हणाले, व्यासपीठावरून मराठीबद्दल आशावाद बाळगला जातो खरा. पण, यंदा १८ टक्के मराठी शाळा कमी झाल्या आहेत. असे होत राहिले, तर मराठी भाषेचे काय होणार हा प्रश्न आहे.
बालसाहित्याचा परीघ व्यापक करण्याची जबाबदारी सर्वाची असल्याचे मत डॉ. मंदा खांडगे यांनी व्यक्त केले. नवीन इंदलकर यांनी आभार मानले.

बालनाटय़ संमेलन पुण्यामध्ये
सुनील महाजन म्हणाले, बालकुमार साहित्य संमेलनापाठोपाठ संवाद, पुणे संस्थेतर्फे मे महिन्यामध्ये बालनाटय़ संमेलन आयोजित करण्याचा मानस आहे. पंढरपूर येथे होणाऱ्या आगामी नाटय़संमेलनासंदर्भात अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या आगामी बैठकीत या संबंधीचा ठराव मांडून तो संमत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.