महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी
टिळक रस्त्यावरील अमित कॉम्लेक्समध्ये असलेले संवाद प्रकाशनाचे कार्यालय महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. संवाद प्रकाशनाचे संपादक विजय कोतवाल यांनी महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असा तक्रार अर्ज विश्रामबाग पोलिसांकडे दिला आहे.
अमित कॉम्प्लेक्स इमारतीत पहिल्या मजल्यावर गेली सोळा वर्ष संवाद प्रकाशनाचे कार्यालय आहे. या कार्यालयाचे मालक संदीप जंजिरे आणि त्यांचे वडील एस. के. जंजिरे यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता महापालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करून संवाद प्रकाशनाचे कार्यालय मंगळवारी (१७ मे) पाडले. मी कार्यालयात नसताना कुलूप तोडण्यात आले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच मी तेथे गेलो. महापालिकेचे अधिकारी कुमावत यांना ही कारवाई थांबविण्याची विनंती केली, असे विजय कोतवाल यांनी सांगितले.
जागा मालकांशी वाद सुरू असल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही बाब विचारात न घेता जागामालकाने दिलेल्या तक्रार अर्जावरून ही कारवाई केली. लघुवाद न्यायालयात दावा दाखल असताना ही कारवाई करण्यात आली. महापालिकेने जागामालक जंजिरे यांना नोटीस बजाविली असेल, तर त्याची माहिती जंजिरे यांनी मला दिली नाही.
गेले सोळा वर्ष संवाद प्रकाशनाचे कार्यालय सुरू असताना अचानक ते बेकायदेशीर ठरविले गेले. महापालिकेचे कृत्य बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असा अर्ज कोतवाल यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत भट यांच्याकडे दिला आहे.