एलबीटी आंदोलनाचे ‘धोरण’ ठरवण्यासाठी शहर राष्ट्रवादीने बोलावलेल्या बैठकीचा सोमवारी पुरता फज्जा उडाला. मात्र, त्याच वेळी व्यापाऱ्यांनी राष्ट्रवादीचे कार्यालय व शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या निवासस्थानासमोर येऊन हुल्लडबाजी केल्याने वेगळेच नाटय़ घडले, पोलिसांनी आंदोलकांना बेदम चोप देऊन त्यांना पळवून लावले. या प्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले व विनापरवाना रॅली काढणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हाही दाखल केला.
एलबीटीविषयी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी परस्परविरोधी भूमिका मांडल्याने गोंधळाची परिस्थिती आहे. आधी एलबीटीला विरोध करणाऱ्या बहल यांनी सोमवापर्यंत  व्यापाऱ्यांनी दुकाने न उघडल्यास आम्ही ती सुरू करू, असा इशारा नुकताच दिला होता, त्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांमध्ये उमटली होती. ‘जशास तसे’ उत्तर देण्याचे आंदोलकांनी ठरवले होते. अशातच, बहल यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक खराळवाडीत बोलावली. आत बैठक सुरू असतानाच व्यापारी रॅलीने कार्यालयाबाहेर आले व घोषणाबाजी करू लागले. गाडय़ांचे हॉर्न जोरजोराने वाजवून हुल्लडबाजीही केली. त्याही पुढे जाऊन त्यांनी बहल यांच्या संत तुकारामनगर येथील ‘वृंदावन’ बंगल्यासमोर जाऊन निदर्शने केली. त्या वेळी बहल कार्यालयात तर त्यांचे कुटुंबीय घरात होते. पोलीस निरीक्षक मोहन विधाते व त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आंदोलक व्यापाऱ्यांना चोप दिला. आंदोलक पुढे तर पोलीस मागे पळत असल्याचे चित्र दिसत होते. वाहने तेथेच टाकून व्यापारी पळून गेले.
तत्पूर्वी, बहल यांच्या बैठकीस हातावर मोजता येईल इतकेच नगरसेवक हजर राहिले. व्यापाऱ्यांना बहल यांनी आक्रमक इशारा दिला असला, तरी जमावबंदीचा आदेश न पाळल्यास कारवाई करण्याचा पावित्रा पोलिसांनी घेतल्यानंतर त्यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला. शेजारच्या इमारतीत आधीच सुरू असलेले टायरचे दुकान उघडल्यासारखे करत चालकास फूल देण्यात आले. छायाचित्रकारांसमोर कार्यकर्त्यांचे फोटोसेशन झाले. माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर ओळीने उभे राहून घोषणाबाजी करण्यात आली. मात्र, व्यापाऱ्यांनी अचानक येऊन केलेल्या उद्योगामुळे वातावरण एकदम बदलून गेले.