X

धूळखात पडलेल्या डेमू लवकरच रुळावर

एक भाग म्हणून पुणे-सोलापूर मार्गावर डेमू गाडीची सेवा सुरू करण्यात आली आहे.

पुणे-सोलापूर मार्गावर डेमू सुरू; इतर मार्गाबाबतही चाचपणी

पुणे विभागाला नव्या चार डेमू (डिझेल मल्टिपल युनीट) गाडय़ा मिळूनही केवळ एका आदेशासाठी त्या धूळ खात पडून होत्या. मात्र, या गाडय़ा रुळावर आणण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे-सोलापूर मार्गावर डेमू गाडीची सेवा सुरू करण्यात आली आहे. पुण्यापासून अडीचशे किलोमीटर अंतरापर्यंतच्या भागामध्येही डेमू गाडय़ांची सेवा सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू करण्यात आली असून, येत्या काही दिवसांत त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

पुणे-दौंड मार्गावर डेमूची सेवा सुरू करण्यात आल्यानंतर इतर मार्गावरही ही सेवा सुरू करण्यासाठी पुणे विभागाला चार नव्या डेमू गाडय़ा देण्यात आल्या. या चारपैकी तीन गाडय़ा खडकी रेल्वे स्थानकावर धूळ खात पडून असल्याचे वृत्त छायाचित्रासह ‘लोकसत्ता पुणे’ सहदैनिकात प्रसिद्ध करण्यात आले होते. डेमू गाडय़ा मिळाल्या असल्या, तरी त्या कोणत्या मार्गावर सुरू कराव्यात, याबाबत वरिष्ठ पातळीवरून आदेश नसल्याने गाडय़ा सुरू होत नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्यानंतर डेमू गाडय़ांबाबत तातडीने नियोजन सुरू करण्यात आले आहे. पुणे-सोलापूर मार्गावर पॅसेंजर गाडीची सेवा बंद करून त्या जागी दोन दिवसांपासून डेमू गाडी सुरु करण्यात आली होती. सकाळी सव्वाआठच्या सुमारास डेमू सोलापूरसाठी सुटते. सोलापूरहून ही गाडी रात्री साडेअकराच्या सुमारास पुण्यासाठी निघून सकाळी पुण्यात पोहोचते.

पुणे-सोलापूर मार्गावर प्रवाशांची मागणी लक्षात घेता पुण्यातून रात्रीही सोलापूरसाठी डेमू सोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुणे- मिरज मार्गावरही डेमू गाडीची चाचणी घेण्यात आली असून, एक डेमू मिरज येथेच ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुणे-कोल्हापूर, सातारा आदी मार्गावरही डेमू सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा याबाबत म्हणाल्या, की नव्या डेमू येऊनही त्या केवळ पडून राहण्याने रेल्वेबरोबरच प्रवाशांचेही नुकसान होत असल्याने या गाडय़ा तातडीने विविध मार्गावर सोडल्या पाहिजेत. पुणे- सोलापूर मार्गावर डेमू सुरू करण्यात आली. पुणे-सातारा, पुणे-लोणंद, फलटण, कुर्डुवाडी, बार्शी, नगर आदी मार्गावरही प्रवाशांची मागणी आहे. या मार्गावर डेमू सुरू करता येईल.

सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना हव्यात!

पुणे-सोलापूर मार्गावर दौंड ते कुर्डुवाडी दरम्यान यापूर्वी प्रवाशांची लूटमार करण्याच्या, त्याचप्रमाणे हाणामारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. डेमू गाडय़ांचे दरवाजे, खिडक्या मोठय़ा आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वेने अधिक काळजीपूर्वक उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. सोलापूरहून पुण्यात आलेल्या डेमू गाडीच्या काही डब्यांतील दिवे रात्री बंद असल्याचा प्रकार बुधवारी (४ ऑक्टोबर) लक्षात आला. असे प्रकार प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याने त्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.

वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain