News Flash

‘देणे समाजाचे’

उपक्रमाद्वारे समाजोपयोगी कामांची ओळख

(संग्रहित छायाचित्र)

समाजोपयोगी कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे आणि अशा कामांसाठी काही ना काही देणगी देऊ इच्छिणाऱ्यांना चांगल्या कामांची ओळख व्हावी, या उद्देशाने सुरू झालेल्या ‘देणे समाजाचे’ या उपक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक संस्थांना या उपक्रमातून चांगली मदत प्राप्त होत आहे.

समाजात अनेक प्रश्न आणि समस्या आहेत आणि त्यांची व्याप्ती पाहता त्या समस्या सोडविण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा उपाययोजना अनेक समाजोपयोगी संस्था सातत्याने करत असतात. स्वाभाविकच, या संस्थांना असे काम करताना आर्थिक मदतीचीही गरज भासते. ही गरज ओळखून वीणा आणि (कै.) दिलीप गोखले यांनी २००५ मध्ये या प्रदर्शन भरवण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली.

‘आर्टिस्ट्री’ या संस्थेतर्फे हे प्रदर्शन भरवण्यात येते. समाजसेवक आणि सामाजिक कार्य यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठीच्या प्रदर्शनाचा हा उपक्रम चौदा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात दरवर्षी पंचवीस ते तीस सामाजिक संस्थांना आमंत्रित केले जाते. या संस्थांनी त्यांच्या कार्याची माहिती प्रदर्शन पाहायला येणाऱ्यांना द्यावी आणि प्रदर्शन पाहायला येणाऱ्यांनी संस्थांची माहिती घेतानाच त्यातील ज्या संस्थेला देणगी द्यावीशी वाटेल वा काही मदत करावीशी वाटेल ती मदत करावी, अशा स्वरूपाचा हा उपक्रम आहे.

प्रदर्शनात सहभागी झालेले ‘समर्पण’ संस्थेचे अमोल मातकर म्हणाले, संस्थेच्या माध्यमातून पीडित आणि समस्याग्रस्त महिलांच्या पुनर्वसनाचे काम अनेक वर्ष केले जात आहे. संस्थेतर्फे महिलांसाठी विविध उपक्रम दरवर्षी राबविले जातात. प्रदर्शनात सहभागी झाल्यामुळे आमच्या अनेक उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली असून अनेक स्वयंसेवक जोडले गेले आहेत.

‘निसर्ग कट्टा’चे प्रेम अवचार म्हणाले, संस्थेच्या माध्यमातून आम्ही अकोला शहर आणि आसपासच्या तालुक्यांतील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचे काम करतो. परंतु हे काम फक्त अकोला शहरापुरते मर्यादित होते. प्रदर्शनामुळे अनेक लोकांपर्यंत उपक्रमाची माहिती पोहोचत असून स्वयंसेवकही जोडले जात आहेत. तसेच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.

सर्पराज्ञी संस्थेचे सिद्धार्थ सोनवणे म्हणाले, जखमी किंवा आजारी वन्यजीवांवर आम्ही उपचार करतो आणि त्यांच्या शरीरात ताकद आली की, त्यांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडून देतो. गेली १५ वर्षे हे काम बीड जिल्ह्य़ात करत आहे. प्रदर्शनात सहभागी झाल्यामुळे आमचे काम लोकांपर्यंत पोहोचत असून अनेकांकडून आमच्या कामाचे कौतुक केले जात आहे. प्रदर्शनामुळे आमच्या सारख्या संस्थांना चांगले व्यासपीठ मिळाले आहे.

आकांक्षा स्पेशल चाइल्ड एज्युकेशन स्कूलच्या राणी चोरे म्हणाल्या, प्रदर्शनात सहभागी होण्याचे आमचे दुसरे वर्ष असून लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे. आतापर्यंत ४०० ते ५०० लोकांनी भेट दिली. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंबरोबरच आर्थिक सहाय्य देखील केले आहे.

प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून देखील उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. नीला सहस्रबुद्धे म्हणाल्या, प्रदर्शनामुळे येणाऱ्या वर्षांत काम करण्यासाठी प्रेरणा, स्फूर्ती आणि ऊर्जा मिळते. तसेच सामाजिक भानाच्या कल्पना विस्तारित होतात. दरवर्षी नवीन संस्थांचा परिचय प्रदर्शनाच्या निमित्ताने होतो.

हे प्रदर्शन रविवापर्यंत (२२ सप्टेंबर) कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉल येथे खुले राहणार असून या प्रदर्शनाद्वारे तीस सामाजिक संस्थांची माहिती घेता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 2:11 am

Web Title: dene samajache identification of social work through activities abn 97
Next Stories
1 टाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद
2 भातशेतीवर ‘चापडा’ सापाचे चित्र
3 मित्राच्या Whats App वर पोस्ट टाकून पत्नी पीडित तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X