डेंगळे पुलावरून होणारी मोठी वाहतूक लक्षात घेऊन या पुलाचे रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक असणारी आखणी सुरू करावी, असा निर्णय महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने घेतला आहे. या निर्णयानुसार डेंगळे पूल सहा पदरी करण्यासाठी तसेच मालधक्का चौकाचे रुंदीकरण करण्यासाठी आखणी प्रक्रिया सुरू होईल.
पुणे महापालिकेने सन २००८ मध्ये तयार केलेल्या र्सवकष वाहतूक आराखडय़ात (कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन-सीएमपी) जुना बाजाराकडे जाणाऱ्या डेंगळे पुलावरील वाहतुकीचा विचार करण्यात आला आहे. सध्याचा पूल वाहतुकीसाठी अपुरा पडत असून येथे सहा मार्गिका असलेल्या पुलाची आवश्यकता असल्याचे आराखडय़ात म्हटले आहे. या पुलाच्या दक्षिण बाजूस स्वतंत्र जोड रस्ता नाही. त्यामुळे या पुलावरून मालधक्का चौकाकडे वळणाऱ्या वाहनांसाठी मोठा रस्ता उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. पुलाच्या दोन बाजूंना कामगार वसाहत झोपडपट्टी आहे. तर अन्य दोन बाजूंना विकास आराखडय़ात आरक्षण दर्शवण्यात आले आहे.
या सर्व बाबींचा विचार करून विकास आराखडय़ातील नियोजनानुसार तसेच सीएमपीमधील प्रस्तावानुसार पुलाचा विस्तार करता येणे शक्य आहे. नवीन तीन पदरी पूल तयार केल्यास सध्याचा पूल एकूण सहा मार्गिकांचा होईल. त्यासाठीचा ठराव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकाश ढोरे आणि अजय तायडे यांनी शहर सुधारणा समितीला दिला होता. त्यावर कलम २०५ अन्वये रस्त्याची आखणी करणे आवश्यक असल्याचा अभिप्राय प्रकल्प विभागाच्या अतिरिक्त नगर अभियंता कार्यालयाने दिला होता.
डेंगळे पुलाचा विस्तार करण्यासाठी महापालिका कायद्यातील कलम २०५ अनुसार रस्त्याची आखणी करावी लागणार आहे. ही आवश्यक व पहिली प्रक्रिया असून ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी मान्यता देण्याचा निर्णय शहर सुधारणा समितीने घेतला आहे. हा ठराव चालू महिन्याच्या मुख्य सभेपुढे अंतिम मंजुरासाठी येईल व मुख्य सभेने मंजुरी दिल्यानंतर रस्ता आखण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकेल.