सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसांमध्येच संशयित रुग्णांची संख्या १७५ पर्यंत

पुणेकरांना हैराण करणाऱ्या विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढत असतानाच डेंग्यूच्या तापाने आपले हातपाय पसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या दहा दिवसांमध्येच डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या १७५ पर्यंत पोहोचली आहे, त्यांपैकी सुमारे सव्वीस रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पावसाच्या विश्रांतीमुळे डेंग्यू, स्वाइन फ्लूसारखे विषाणूजन्य आजार मोठय़ा प्रमाणात पसरत असल्याने साथीच्या रोगांचा फैलाव वेगाने होत असलेला दिसून येत आहे. स्वाइन फ्लूच्या बरोबरीने डेंग्यूनेही नागरिकांवरील पकड घट्ट केली असून ऑगस्ट महिन्यात शहरातील त्र्याण्णव लोकांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसांमध्येच ही संख्या सव्वीसपर्यंत गेल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीवरुन ही आकडेवारी समोर आली आहे.

जनरल फिजिशियन डॉ. सुहास नेने म्हणाले,की  डेंग्यूच्या रुग्णांची होणारी नोंद आणि प्रत्यक्ष रुग्णसंख्या यांमध्ये कमालीची तफावत दिसून येत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. तीव्र ताप, अंग दुखणे, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे, डोळ्यांच्यामागे तीव्र वेदना होणे ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे असून त्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरु शकते. रुग्णांची संख्या वाढत असली तरी आजाराची तीव्रता काहीशी कमी झाल्याने योग्य वेळेत औषधोपचार सुरु केले असता रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती निर्माण होत नाही.

ऑगस्टमध्ये ९३ रुग्णांना डेंग्यूचे निदान

२०१८ या वर्षांतील पुणे शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २५५ पर्यंत जाऊन पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वात जास्त रुग्ण ऑगस्ट महिन्यात आढळून आले आहेत. जानेवारीमध्ये वीस, फेब्रुवारीमध्ये चार, मार्च महिन्यात डेंग्यूचा एक रुग्ण आढळला. एप्रिल महिन्यात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळलेला नाही, मात्र मे महिन्यात तीन रुग्ण आढळून आले आहेत.

पावसाळ्याची सुरुवात होताच रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे जून महिन्यात अठ्ठावीस रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे. जुलै महिन्यात ऐंशी तर ऑगस्टमध्ये त्र्याण्णव रुग्णांना डेंग्यूचे निदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.