वातावरणातील बदलांमुळे एका बाजूला विषाणूजन्य आजार फैलावत असताना दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास सुरूच असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या २३०० ठिकाणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी याबाबतची माहिती दिली. डॉ. वावरे म्हणाले, पावसाळ्याच्या काळात विषाणूजन्य आजारांच्या वाढीचा वेग मोठा असतो. त्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागामार्फत डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याची मोहीम चालवण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून ज्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात नाही त्या ठिकाणांना नोटीस बजावण्यात येत आहे. या मोहिमेतून सुमारे २३०० उत्पत्तीस्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या. जून आणि जुलै या पावसाळ्याच्या काळात ही मोहीम अधिक सतर्कपणे रावबली गेली. त्या दरम्यान सुमारे अडीच लाख ठिकाणांवर डेंग्यू डासांना प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात आली. त्यापैकी २३०० ठिकाणे डासांच्या उत्पत्तीसाठी पूरक आढळल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली. सुमारे सहा हजार ठिकाणे बंद होती आणि साडेतीन हजार ठिकाणी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना पहाणी करू देण्यात आली नाही. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती साठलेल्या पाण्यात होत असल्याने कोठेही पाणी साठून राहाणार नाही याची खबरदारी नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. झाडांच्या कुंडय़ांमध्ये साठलेले पाणी, गच्चीवर ठेवलेले अडगळीचे सामान यांमध्ये पाणी साठून राहिले असता त्यामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरात, इमारतींमध्ये किंवा परिसरात पाणी साठून राहाणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.