डेंग्यूच्या रुग्णांची जुलैपासून वाढू लागलेली संख्या अद्यापही वाढत असून ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत दर दिवशी डेंग्यूचे सरासरी १८ संशयित रुग्ण सापडत आहेत. त्याच वेळी निष्काळजीपणे पाणी साठू देऊन डासांच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल नागरिकांसह व्यावसायिकांना पालिकेने बजावलेल्या नोटिसांची संख्याही वाढते आहे.
जानेवारीपासून आतापर्यंत शहरात डेंग्यूचे एकूण १४२८ संशयित रुग्ण आढळले आहेत. ऑगस्टमध्ये दर दिवशी सरासरी १८ रुग्णांना डेंग्यू होत असून पालिकेच्या आकडेवारीनुसार ऑगस्टच्या केवळ तिसऱ्या आठवडय़ात डेंग्यूचे ११३ रुग्ण सापडले आहेत. दुसरीकडे नागरिक अजूनही डेंग्यूबद्दल गंभीर नसल्याचेच दिसून येत आहे. पालिकेने आतापर्यंत तब्बल १२०० जणांना डासांची पैदास होईल अशा पद्धतीने पाणी साठू दिल्याबद्दल नोटिस बजावल्या आहेत, तर ८ जणांवर खटले भरले आहेत. तरीही डासांची वाढ रोखण्यासाठी त्याचा फारसा फायदा न झाल्याचेच रुग्णांच्या संख्येवरून उघड होत आहे.
फेब्रुवारीपासून मे महिन्यापर्यंत आटोक्यात असलेल्या डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येने जूनमध्ये एकदम उसळी घेतली. जुलैमध्ये ही संख्या जूनच्या तुलनेत एकदम अडीच पटीने वाढली. डेंग्यूचा हा फैलाव ऑगस्टमध्येही वाढतोच आहे. पालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाचे प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, ‘‘डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण घोले रस्ता, हडपसर आणि धनकवडीत सापडत आहेत, तर भवानी पेठेत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या सर्वात कमी आहे. हे सर्व डेंग्यूचे संशयित रुग्ण असून राष्ट्रीय विषाणू संस्था आणि ससून रुग्णालयाने तपासणीअंती डेंग्यूचे रुग्ण म्हणून जाहीर केलेल्या रुग्णांची संख्या ६७ आहे.’’
‘स्वाइन फ्लू’लाही सुरुवात
शहरात आतापर्यंत सापडलेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या आता १८ झाली आहे. यातील ५ जणांना मृत्यू झाला असून हे सर्व रुग्ण पुण्याबाहेरून शहरात उपचारांसाठी आले होते. स्वाइन फ्लूच्या एकूण रुग्णांपैकी ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर २ रुग्ण अद्याप रुग्णालयात दाखल आहेत.
ताप डेंग्यूचा की स्वाइन फ्लूचा हे कसे ओळखावे?

डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलेली काही विशिष्ट लक्षणे पुढीलप्रमाणे –
स्वाइन फ्लू- खूप अधिक प्रमाणात आणि सतत ताप राहतो, घसा दुखतो, सर्दी
डेंग्यू- अंग खूप दुखते, अंगावर लाल पुरळ उठते, नंतर अंगावर लाल चट्टे पडू शकतात. मात्र डेंग्यूमध्ये सहसा घसा दुखण्याचे लक्षण दिसत नाही.