ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक ४६५ नवे रुग्ण; खबरदारी घेण्याचे आवाहन

शहर आणि परिसरात लांबलेल्या पावसामुळे डेंग्यूचा धोका कायम आहे. ऑक्टोबर महिन्यात १,५८७ संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यातील तब्बल ४६५ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले. या वर्षी डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण याच महिन्यात आढळले आहेत. सद्य:स्थिती लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घेण्याबरोबरच योग्य ती कार्यवाही करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे डेंग्यूच्या स्थितीबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, की ऑक्टोबर महिन्यात या वर्षांतील सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण शहरात आढळून आले आहेत. जून महिन्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर डेंग्यूचा फैलाव सुरू झाला, मात्र ऑगस्टपर्यंत रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. जूनमध्ये बत्तीस, जुलैमध्ये त्र्याहत्तर डेंग्यूचे रुग्ण शहरात आढळले. ऑगस्टमध्ये ही संख्या एकशे सत्तावन्न, सप्टेंबरमध्ये तीनशे एकवीस तर ऑक्टोबर महिन्यात चारशे पासष्ट झाली.

अति दक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. रवींद्र छाजेड म्हणाले, की सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेला पाऊस, शहरात अनेक ठिकाणी ओढवलेली पूरसदृश परिस्थिती यामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. डेंग्यूमधून संपूर्ण बरा झालेल्या रुग्णाला दोन ते तीन आठवडय़ांनी पुन्हा डेंग्यूची लक्षणे दिसली. तपासण्या केल्या असत्या पुन्हा डेंग्यूचे निदान झाले. अनेक वर्षे डेंग्यूचे रुग्ण पाहात आहे, मात्र हे प्रथमच दिसून आले. त्यामुळे रुग्णांनी बरे झाल्यावर देखील खबरदारी घ्यायला हवी. विषाणूजन्य आजारावर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध, संपूर्ण विश्रांती, योग्य आहार आणि भरपूर पाणी पिणे अत्यावश्यक आहे.

जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, की ऑक्टोबर महिन्यात शहराच्या सगळ्याच भागांत डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. प्लेटलेट कमी होण्याचा वेगदेखील लक्षणीय आहे, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

काय काळजी घ्यावी?

* विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावे.

* औषध दुकानात जाऊन स्वतच्या मनाने घेतलेली अ‍ॅस्पिरीन, ब्रुफेन सारखी औषधे डेंग्यूमध्ये घातक ठरू शकतात.

* रक्तदाब, मधुमेह किंवा इतर विकार असल्यास संपूर्ण विश्रांती घ्या.

मेट्रोचे खोदकाम डासांचे उत्पत्तीस्थान

शहरात अनेक ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रो उभारणीसाठी करण्यात आलेल्या खोदकामांच्या ठिकाणी पावसामुळे पाणी साठत आहे. त्यात डेंग्यू डासांच्या अळ्यांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणावर होत आहे. त्यामुळे वाढलेल्या डेंग्यूला अप्रत्यक्षपणे मेट्रोचे कामही कारणीभूत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

थोडय़ा विश्रांतीनंतर सातत्याने पडणारा पाऊस, दिवसभर ऊन आणि रात्री थंडी असे अत्यंत विषम वातावरण असल्याने ते डेंग्यूच्या वाढीसाठी पोषक ठरत आहे. तब्बल दोन हजार दोनशे ठिकाणी डेंग्यू डासांची उत्पत्ती स्थळे आढळल्याने नोटिसा देण्यात आल्या आहेत.

– डॉ. संजीव वावरे, महापालिका सहायक आरोग्य अधिकारी