शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात कोण लढणार याबाबत उत्सुकता असताना अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळाला. विशेष म्हणजे सर्वत्र खासदारकीची उमेदवारी मिळवण्यासाठी चढाओढ सुरू असताना या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीचे दिग्गज तयार नव्हते. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार वल्लभ बेनके, आमदार विलास लांडे यांच्यापैकी कोणीही तयार नसल्याने शेवटी भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली.
जुन्नर येथील पक्षाच्या मेळाव्यात अजित पवार यांनी निकम यांची उमेदवारी जाहीर केली. आढळराव यांची खासदारकीची सलग दुसरी वेळ आहे. त्यांनी २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक मोहोळ यांचा पराभव केला होता. त्यानंतर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी याच पक्षाचे विलास लांडे यांच्यावर दणदणीत विजय मिळवला होता. विशेष म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार आहेत. तरीसुद्धा या पक्षाला तिथे लोकसभेसाठी उमेदवार मिळत नव्हता. वळसे पाटील, बेनके आणि लांडे हे तिघेही तेथून लढण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे नको असतानाही उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर अजित पवार यांनी बुधवारी जुन्नर येथील मेळाव्यात निकम यांचे नाव जाहीर करून यावर पडदा टाकला.
जुन्नर येथील शिवप्रेमी मेळाव्यात मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी अगदी शेवटच्या क्षणी देवदत्त निकम यांची उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी अधिकृत असून, पक्षाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ती जाहीर केली आहे, असे त्यांनी सांगितले.
 
‘‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्याशी विचारविनिमय करून निकम यांची उमेदवारी जाहीर करत आहोत. निकम हे उच्चशिक्षित असून सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. सरपंच ते भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास झाला आहे. या भागातील खासदार नानासाहेब नवले, अण्णासाहेब मगर व सध्याचे खासदार हे साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. निकम देखील अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते खासदार होतील. जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्याने त्यांना मताधिक्य द्यावे.’’
– अजित पवार, उपमुख्यमंत्री