चांगल्या ठिकाणी बदली करण्यासाठी मित्रांकडून पैसे घेऊन त्याला परत न करता फसवणूक करणाऱ्या महापालिकेच्या उपअभियंत्याला खडक पोलिसांनी अटक केली आहे.
लालासाहेब संभाजी तडाखे (वय ५१, रा. पीएमसी कॉलनी, घोरपडे पेठ) असे अटक केलेल्याचे अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी नीलेश विश्वास मते (वय २५, रा. खडकवासला) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेत तडाखे हे उप-अभियंता म्हणून काम करतात. तर फिर्यादी मते हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तडाखे याने फिर्यादीचे मित्र प्रित बाबेल (रा. मुकुंदनगर) यांना चांगल्या ठिकाणी बदली करण्यासाठी पंधरा लाख रुपये हवे आहेत. तुम्ही पंधरा लाख रुपये दिल्यास सहा महिन्यात तीस लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले. बाबेल यांनी तडाखे यांना जानेवारी महिन्यात तडाखेंना पंधरा लाख रुपये दिले. मात्र, त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदलीही झाली नाही. त्यांनी घेतलेले पंधरा लाख रुपयेही दिले नाहीत.  त्यामुळे मते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तडाखेच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.