18 November 2019

News Flash

महाविद्यालयांच्या हिशोबांची तंत्रशिक्षण विभागाकडून झाडाझडती

शिष्यवृत्ती रक्कम थकलेली असल्याचे कारण देत सुविधा किंवा शिक्षकांना वेतन न देणाऱ्या महाविद्यालयांचे बिंग फोडण्याचा चंग तंत्रशिक्षण विभागाने बांधला आहे.

महाविद्यालयांमधील सुविधा, थकलेले वेतन याबाबत चर्चा झाली की शासनाकडून महाविद्यालयाला न मिळणाऱ्या शिष्यवृत्ती रकमांचाही विषय येतो. शिष्यवृत्ती रक्कम थकलेली असल्याचे कारण देत सुविधा किंवा शिक्षकांना वेतन न देणाऱ्या महाविद्यालयांचे बिंग फोडण्याचा चंग तंत्रशिक्षण विभागाने बांधला आहे. महाविद्यालयांच्या हिशोबाची झाडाझडती तंत्रशिक्षण संचालनालयाने केली आहे.
तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांतील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना आणि सामाजिक निकषांवर शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, शुल्क माफी असतानाही महाविद्यालयांकडून पूर्ण शुल्क आकारले जाते, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नाही अशा तक्रारी विद्यार्थ्यांकडून सातत्याने करण्यात येतात. शासनाकडूनच शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नसल्याचे कारण महाविद्यालयांकडून देण्यात येते. काही महाविद्यालयांची शेकडो कोटी रुपयांची शिष्यवृत्तीची रक्कम शासनाकडून थकली आहे. मात्र महाविद्यालयांमधील सुविधा, शिक्षकांचे थकलेले वेतन अशा अडचणींवरही शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नसल्याचे कारण महाविद्यालये सर्रास देत असतात. या सगळ्या पाश्र्वभूमीवर तंत्रशिक्षण विभागाने महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन शिष्यवृत्तीच्या हिशोबांची पाहणी केली. याशिवाय सर्व महाविद्यालयांकडून शुल्क, प्रवेश यांबाबतचे तपशीलही मागवण्यात आले आहेत. प्राध्यापकांना वेतन वेळेवर देण्यात येते का, त्याचे तपशील, वेतन किती आहे याचे तपशील, आवश्यक शिक्षक पदे, प्रत्यक्ष काम करणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या, वेतन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास विभाग आणि तंत्रशिक्षण विभागाकडून थकलेली शिष्यवृत्तीची रक्कम, वेतन थकले असल्यास त्याची कारणे असे तपशील तंत्रशिक्षण विभागाने मागवले आहेत.
पुणे विभागात येणाऱ्या सर्व जिल्ह्य़ांमधील ज्या महाविद्यालयांबाबत वेतन किंवा शिष्यवृत्ती मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्या महाविद्यालयांची पाहणी करण्यात आली. अभियांत्रिकी, औषधनिर्माण, व्यवस्थापन महाविद्यालयांची पाहणी करण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्य़ातील १७, कोल्हापूर जिल्ह्य़ातील २२, सोलापूर जिल्ह्य़ातील १७ आणि पुणे जिल्ह्य़ातील २७ महाविद्यालयांचा समावेश आहे. महाविद्यालयाची प्रवेश क्षमता, प्रत्येक कोटय़ानुसार झालेले प्रवेश, आकारण्यात येणारे शुल्क, त्याचे हिशोब असे तपशील तंत्रशिक्षण विभागाकडून नेमण्यात आलेल्या समितीकडून तापासण्यात आले. यामध्ये पुण्यातील नावाजलेली अनेक महाविद्यालयेही आहेत.

First Published on January 14, 2016 3:26 am

Web Title: department technical education colleges voluntarily raided
टॅग Colleges