News Flash

भक्तिचैतन्याने भारलेल्या वातावरणात माउलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान

भक्तिचैतन्याने भारलेल्या वातावरणात लाखो वैष्णवांच्या संगतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

| July 1, 2013 02:55 am

इंद्रायणीच्या तीरावर जमलेला वैष्णवांचा मेळा.. अवघ्या अलंकापुरीत सुरू असलेला टाळ-मृदंगाचा नाद अन् माउलींच्या समाधी मंदिरातील भक्तिकल्लोळ.. अशा भक्तिचैतन्याने भारलेल्या वातावरणात लाखो वैष्णवांच्या संगतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने मागील दोन दिवसांपासूनच अलंकापुरीत वारकऱ्यांच्या दिंडय़ा दाखल होत होत्या. रविवारी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटेपासूनच लगबग सुरू झाली होती. इंद्रायणीत पहाटे स्नान झाल्यानंतर माउलींच्या दर्शनासाठी भक्ती सोपान पुलावर मोठी रांग लागली होती. देऊळवाडय़ामध्ये पहाटे घंटानाद, काकडा, अभिषेक, पंचामृतपूजा, दुधारती या कार्यक्रमांनंतर प्रस्थान सोहळ्याची तयारी करण्यात आली. प्रस्थान सोहळ्यासाठी दुपारी एकच्या सुमारास दर्शनबारी बंद करण्यात आली. पालखी प्रदक्षिणा रस्त्यावर रांगोळ्यांच्या पायघडय़ा टाकण्यात आल्या. माउलींच्या समाधीवर मुखवटा ठेवून तुळशीहार व गुलाबपुष्पांचा हार घालण्यात आला. त्याचवेळी अकरा ब्रह्मवृंदांचा मंत्रघोषही सुरू होता. प्रस्थान सोहळ्यासाठी मानाच्या दिंडय़ांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर खऱ्या अर्थाने भक्तिकल्लोळ सुरू झाला.
दुपारी साडेतीनच्या सुमारास फुलांनी सजविलेली पालखी आळंदीकरांनी वीणा मंडपामध्ये आणली. त्या वेळी वारकऱ्यांचे खेळही सुरू झाले. संध्याकाळी साडेपाच वाजता माउलींच्या अश्वाचा प्रवेश झाला. गुरू हैबतबाबा यांच्या वतीने बाळासाहेब आरफळकर व देवस्थानच्या वतीने श्रींची आरती करण्यात आली. प्रमुख विश्वस्त सुधीर पिंपळे, डॉ. प्रशांत सुरू, डॉ. शिवाजीराव मोहिते, शामसुंदर मुळे, सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार आदी या वेळी उपस्थित होते. वीणा मंडपातील मानकऱ्यांना मानाचा नारळ प्रसाद देण्यात आल्यानंतर वीणा मंडपातील पालखीमध्ये श्रींच्या पादुका ठेवण्यात आल्या. चोपदारांकडून श्रींच्या आरतीनंतर ‘माउली माउली’ असा एकच घोष करीत आळंदीकरांनी पालखी खांद्यावर घेतली व मंडपाबाहेर आणली. पालखी दृष्टीस पडताच वारकऱ्यांमध्ये एक अनोखे चैतन्य साकारले. या भक्तिचैतन्याच्या वातावरणातच पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाली. चावडी चौकमार्गे पालखी रात्री सव्वाआठच्या सुमारास आजोळघरी मुक्कामी पोहोचली. माउलींची पालखी सोमवारी पुणे मुक्कामी दाखल होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2013 2:55 am

Web Title: departure of palanquin of sant dnyaneshwar from alandi
Next Stories
1 ‘मसाप’च्या घटनेमध्ये होणार दुरुस्ती
2 २५ टक्के आरक्षित जागा भरा, किंवा वर्षभर रिक्त ठेवा! – शिक्षण विभाग
3 जगद्गुरू तुकोबांच्या पालखीचे उद्योगनगरीत स्वागत
Just Now!
X